सोलापूर : कोरोना झालेल्या रुग्णांसाठी शहरात महापालिकेच्यावतीने कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले असून, त्या ठिकाणी काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा इन्शुरन्स (विमा) अद्याप काढण्यात आलेला नाही. कर्मचारी जीव मुठीत घेऊन काम करत असताना त्यांच्या भविष्याची कसलीच हमी त्यांना देण्यात आलेली नाही. आता कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याने त्यांच्या नोकरीवरही गदा येणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
गेल्यावर्षी कोरोनाचा संसर्ग संपूर्ण देशात पसरला. केंद्र व राज्य सरकारने संचारबंदी जाहीर केली होती. रुग्णांना उपचार करण्यासाठी महापालिका व शासकीय रुग्णालयात कोविड सेंटर्स उभारण्यात आली आहेत. रुग्णांना सेवा देण्यासाठी दोन्हीकडे कंत्राटी कर्मचारी घेण्यात आले होते. कालांतराने कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर डिसेंबर महिन्यात या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले होते. मात्र, नंतर पुन्हा फेब्रुवारीपासून संसर्ग वाढण्यास सुरुवात झाल्यानंतर पुन्हा कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यात आले आहे. हे कर्मचारी दररोज ८ ते १२ तासापर्यंत रुग्णसेवा करीत आहेत. या कर्मचाऱ्यांचा विमा उतरविण्यात आला नाही. कर्तव्य करत असताना या कर्मचाऱ्यांना जर कोरोनाची बाधा झाली किंवा त्यामध्ये त्यांचे काही बरे-वाईट झाले, तर भविष्यातील कोणत्याही सुरक्षेची हमी त्यांना देण्यात आलेली नाही.
२ ते ६ महिन्यांचे कॉन्ट्रॅक्ट
कोरोनाग्रस्त रुग्णांच्या सेवेसाठी शासकीय रुग्णालयात किंवा कोविड सेंटरमधील नर्स, ब्रदर, परिचारिका, टेक्निशियन, मायक्रो बायोलॉजिस्ट, डेटा एंट्री ऑपरेटर असे एकूण अंदाजे ९० ते १२५ जण कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांच्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर घेण्यात आले आहे.
महानगरपालिकेच्यावतीने कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी एकूण १५ ते २० कोविड सेंटर्स असून, त्या ठिकाणी २८० हून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले आहे. यामध्ये अंदाजे ५० डॉक्टर्स, ९६ स्टाफ नर्स, १० वॉर्डबॉय, १५ टेक्निशियन व साफसफाई करणारे कर्मचारी आदींचा समावेश आहे. कर्मचाऱ्यांना तीन ते सहा महिन्यांच्या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने काम देण्यात आले आहे.
वेळ पडली तेव्हा बोलाविले, नंतर हाकलले...
१) पूर्वी खासगीमध्ये काम करत होतो. आता शासनाने कंत्राटी पद्धतीने सोलापूर महानगरपालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये घेतले आहे. आम्ही जिवाची पर्वा न करता त्या ठिकाणी काम करतोय. शासनाने याचा विचार करावा आणि आम्हाला सेवेत कायमस्वरूपी रुजू करून घ्यावे.
- कंत्राटी कर्मचारी
२) माझ्या घरचे मला या कामासाठी विरोध करीत आहेत. मात्र, सामाजिक भान ठेवून मी हे काम स्वतःहून स्वीकारले आहे. नातेवाईक, मित्रमंडळी दररोज मला या कामाबाबत भीती घालत आहेत. मात्र, मी माझ्या निर्णयावर ठाम असून यातून मला एक वेगळा आनंद मिळतो.
- कंत्राटी कर्मचारी
३) महापालिकेकडे मनुष्यबळ कमी आहे. कोरोना या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांची हेळसांड होऊ नये किंवा त्यांना चांगली सेवा मिळावी, यासाठी मी हे काम स्वीकारले आहे. मी ‘रुग्णसेवा, हीच ईश्वरसेवा’, असे मानून काम करत आहे.
- कंत्राटी कर्मचारी
--------------
शासकीय सेवेत सामावून घ्या...
सध्या कोरोनाने देशभर थैमान घातले आहे. अशा आणीबाणीच्या काळात आम्ही स्वतःच्या जिवाची व परिवाराची पर्वा न करता रुग्णसेवेसाठी काम करीत आहोत. आम्ही आमचे काम प्रामाणिकपणे पार पाडत असून, जास्तीत जास्त लोकांचे प्राण कसे वाचतील यासाठी प्रयत्नशील आहोत. समाजासाठी आणि देशसेवेसाठी आम्ही हे कार्य हाती घेतले आहे. याची दखल घेऊन शासनाने आम्हाला वाऱ्यावर न सोडता शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशी एक प्रामाणिक अपेक्षा असल्याचे मत कंत्राटी कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होत आहे.