कुर्डूवाडी : येथील रेल्वे कॉलनीत वास्तव्यास असलेली एक ५९ वर्षीय अविवाहित महिला पाच दिवसांपूर्वी आजारी पडली. तिच्या शेजारच्या ओळखीच्या व्यक्तींना ही घटना समजताच त्यांनी डॉक्टरांना तपासणीसाठी बोलाविले. तपासणीत ती कोरोनाबाधित असल्याचे दिसून आले. तिने दवाखान्यात जाण्याऐवजी स्वतःला घरातच होम आयसोलेशन करून घेतले. स्वतःची योग्य ती काळजी घेऊ लागली. पण दुर्दैव आड आलं अन् तिचा मृत्यू झाला. माणुसकीच्या भावनेतून दोन तरुण पुढे आले.. त्यांनी भडाग्नी देऊन अजुनही माणुसकी जिवंत असल्याचं दाखवून दिलं.
होम आयसोलेशन करून घेतलेल्या महिलेला अचानक मंगळवारी पहाटे तिला जास्त त्रास जाणवू लागला. कोणाला कळायच्या आतच तिचा त्यात मृत्यू झाला. घरात ती एकटीच राहत असल्याने आणि कोणी नातेवाईक जवळ नसल्याने तिच्या मृत्यूची घटना लवकर कोणाला समजली नाही. कोरोनाने तिचा मृत्यू झाल्याने तिच्या घराकडे कोणीही फिरकलेही नाही.
दरम्यान, तिचे एक समाज बांधव घराजवळ आले आणि ती मरण पावल्याचे त्यांच्या लक्षात आले. पण तिच्या घरात जाण्याचे धाडस कोणाचेही होईना.
--
पीपीई कीट घालून घेतला पुढाकार
रिपाइंचे कार्यकर्ते जितेंद्र गायकवाड यांना याची माहिती मिळाली. त्यांनी तिच्या अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घेतला. स्वतःच पीपीई कीट घालून तिचा मृतदेह बंदिस्त केला. तिच्या समाजातील रूढी परंपरेनुसार अंत्यसंस्कार केले. या कार्यात एका डेव्हिड नावाच्या तरुणानंही साथ दिली. कोरोना महामारीत अजून माणुसकी हरवलेली नाही याचे प्रत्यंतर जितेंद्र गायकवाड यांनी आणून दिले. धोका पत्करून त्यांनी केलेल्या कार्याचे कुर्डूवाडीकरांनी कौतुक केले.
.........................
फोटो : २१ कुर्डूवाडी १
कोरोनाबाधित महिलेच्या मृत्यूनंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तयारी करताना जितेंद्र गायकवाड व डेव्हिड.