सोलापूर : ते सर्वांसाठी आदर्श होते. दोघांचाही स्वभाव प्रेमळ होता. ते फक्त पती-पत्नी नव्हते तर चांगले मित्र देखील होते. चाळीस वर्षांच्या सुखी वैवाहिक जीवनाची अनुभूती त्यांच्याकडे होती. सर्वांसाठी आदर्श जोडपे असलेल्या पती-पत्नीचं एकाचवेळी अचानकपणे निधन झाले. त्यामुळे सोलापुरात हळहळ व्यक्त होत आहे. पती प्रकाश भैरुलाल कोठारी (वय ६४ )तर पत्नी विमल कोठारी (६०) असे या निधन झालेल्या पती-पत्नीचे नाव आहे.
प्रकाश कोठारी हे व्यापारी सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष होते. वर्धमान नगर हौसिंग सोसायटीचे संस्थापक अध्यक्षपदावर त्यांनी काम केले. सामाजिक कार्यात हिरिरीने भाग घेणारे प्रकाश कोठारी हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना किडनीचा त्रास होता. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मागील चौदा दिवसांपूर्वी त्यांची पत्नी विमल कोठारी या कोरोनावर उपचार घेत होत्या. तीन दिवसांपूर्वी त्या कोरोना निगेटिव्हही झाल्या; पण त्यांना न्यूमोनियाचा त्रास सुरू झाला.
सोमवारी पहाटे रुग्णालयात अचानकपणे विमल कोठारी यांचे निधन झाल्याची दुदैर्वी बातमी मुलगा श्रीपाल यांना कळाली. इकडे वडील आजारी आहेत. वडिलांना ही बातमी कशी सांगू, या विवंचनेत ते होते. त्यामुळे मध्यरात्री वडिलांना काही न सांगता त्यांना झोपू दिलं. पहाटे सांगूया, या उद्देशाने ते माघारी फिरले. पहाटे पाच ते सहा दरम्यान ते वडिलांच्या खोलीत गेले. त्यावेळी वडील बेडवर निपचित पडलेले दिसले. वडिलांना उठवण्याचा प्रयत्न केला असता वडील इहलोक सोडून गेल्याचं त्यांना कळलं. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार प्रकाश कोठारी यांचं पहाटे दोन ते चार दरम्यान निधन झाल्याचे समजले.------------एकमेकांशिवाय राहत नव्हते...श्रीपाल कोठारी सांगतात, माझ्या आई-वडिलांचं एकमेकांवर फार प्रेम होतं. ते दोघं एकमेकांशिवाय राहत नव्हते. कुठेही ते सोबतच जायचे. आनंदी राहायचे. सर्वांसाठी आदर्श जोडपं होतं. दोघंही एकाचवेळी इहलोक सोडून जातील, असं कधीही वाटलं नव्हतं.