सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरूनाने लोकांची झोप उडवली आहे. जिल्हा प्रशासनाने गुरुवारी सकाळी जाहीर केलेल्या अहवालात ४२ पैकी ११ रुग्ण जिल्ह्यातील आहेत.
सोलापूर जिल्ह्यात बुधवारी १२ रुग्ण आढळले होते, गुरुवारी ११ रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये पंढरपूर शहर: ५ अक्कलकोट: ३ सांगोला: १ आणि कुंभारी: २ अशी रुग्णांची संख्या आहे. जिल्हा प्रशासनाने २८ मे रोजी सकाळी आठ वाजताचे १२९ तपासणी अहवाल प्रसिद्ध केले. त्यामध्ये ४२ अहवाल पॉझिटिव्ह (पुरूष १७, महिला: २५ ) आहेत तर निगेटिव्ह ८७ जण आहेत. एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. अशाप्रकारे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७०९ तरएकूण निगेटिव्ह: ५ हजार ५८०0 इतके आहेत. अशाप्रकारे आत्तापर्यंत एकुण ६ हजार २८९ इतक्या चाचण्या झाल्या आहेत. एकुण बळींची संख्या ६७ वर गेली आहे.
जिल्ह्यात गुरुवारी पुन्हा नवे 'कोरोना'चे रुग्ण आढळल्याने जिल्हा आरोग्य विभागाचे पथक सांगोला, कुंभारी येथे रवाना झाले आहेत, तर अक्कलकोट, पंढरपूर शहर हा विभाग जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या निगराणीखाली आहे.
आतापर्यंत सोलापूर शहरात 'कोरोना'चे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत, पण आता गेल्या दोन दिवसात 'कोरोना'ने जिल्ह्यात घुसखोरी केली असल्याचे दिसून येत आहे. यामुळे आरोग्य विभागाबरोबरच नागरिकांचीही चिंता वाढली आहे. नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.