सोलापूर - एकीकडे कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहे. गर्दी टाळण्यासाठी विविध कडक निर्बंध राज्य सरकारने लागू आहेत. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पंढरपुरातील एका कार्यक्रमात चक्क कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आल्याचे दिसून आले. या सभेतील काही नेते व पदाधिकारी यांच्या तोंडाला मास्क नसल्याचेही पहावयास मिळाले.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूकीच्या प्रचारासाठी दोन दिवसाच्या दौर्यावर आले आहेत. गुरूवारी सकाळी त्यांनी पंढरपुरात जाहीर सभा घेतली. या जाहीर सभेत भाजपचे नेते कल्याणराव काळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
दरम्यान, जर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यक्रमात नियम पाळले जात नसतील तर सर्वसामान्य लोकांनीच नियम पाळावे का ? त्यांनीच दंड भरावा का ? असा सवाल उपस्थित होत आहे. एकीकडे गर्दी होत असल्याने दुकाने, मॉल व इतर सर्वकाही बंद करण्यात आले असतानाच नेत्यांच्या सभेत गर्दी होताना कोरोना पसरत नाही का असाही सवाल व्यापारी वर्गातून उपस्थित होत आहे.