गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येक अमावस्येच्या दिवशी उंदरगावच्या आश्रमात भक्तांची मोठी गर्दी असते. मात्र, त्यात आता प्रथमच खंड पडणार आहे. कारण, गेल्या काही दिवसांपासून उंदरगाव आश्रमाचा विषय राज्यभरात गाजत आहे. त्यामुळे कोरोनाचे कारण पुढे करीत आश्रमच बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच आश्रमास अनधिकृत कनेक्शन घेऊन वीजचोरी करण्यात आली. यासंदर्भात गावकऱ्यांनी तक्रार केल्यानंतर वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वायरमनला पाठवून बेकायदा कनेक्शन कट केले. पण वीजचोरीप्रकरणी पंचनामा अथवा फसवणुकीचा गुन्हा दाखल केला नाही अथवा चोरी करून वापरलेल्या विजेची दंडात्मक वसुली अद्याप केलेली नाही. सर्वसामान्य माणसाने आकडा टाकून वीजचोरी केली तर त्याच्यावर लगेच गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई केली जाते. पण तब्बल दहा वर्षांपासून वीजचोरी होत असलेल्या आश्रमावर कारवाई का होत नाही, असा सवाल उपस्थित करत संबंधितांवर गुन्हा दाखल करून वापरलेल्या विजेची दंडात्मक वसुली करावी, अशी मागणी उंदरगाव येथील धनंजय कांबळे यांच्यासह ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीचे करमाळा येथील उपकार्यकारी अभियंता यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
...........
सखोल चौकशी करा
उंदरगाव येथील महाराजांनी केलेल्या फसवणुकीच्या तक्रारी करमाळा पोलिसात दाखल झालेल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करावा अन्यथा अंनिसच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अंनिसचे अहमदनगर शाखेचे कार्याध्यक्ष व्ही. आर. गायकवाड यांनी दिला आहे.
..........
उंदरगाव येथील आश्रमात गेली आठ वर्षांपासून बाबांचा दरबार भरतोय. कोरोनाच्या कालावधीतही हजारो भक्त प्रत्येक अमावस्येला गर्दी करत होते. त्यावेळी कोरोना व संचारबंदी नव्हती का? मग आताच कोरोना व संचारबंदीचे कारण पुढे का करण्यात येत आहे. यातूनच महाराजांची दुटप्पी भुमिका दिसून येते.
- रवींद्र म्हेत्रे, काझड, ता. इंदापूर
........
फोटो ओळी
उंदरगाव येथील आश्रमासमोर कोरोनामुळे आश्रम बंद असल्याचे फलक लावल्याचे दिसत आहे.
..
फोटो ०५ करमाळा उंदरगाव