गुरुप्रतिपदेनिमित्त सकाळी ८.३० वाजता ज्योतिबा मंडपात देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते पुरोहित मंदार महाराज व सहकाऱ्यांच्या उपस्थितीत लघुरुद्र अभिषेक व दुपारी ११:३० वाजता नैवेद्य आरती संपन्न होईल. याप्रसंगी बाहेरील भाविकांचा सहभाग असणार नाही. सालाबादाप्रमाणे सायंकाळी ५ ते रात्री ०९:३० या वेळेत अक्कलकोट शहरातून भजन, दिंड्यांसह सवाद्य निघणारा पालखी सोहळा व गुरूप्रतिपदेनिमीत्त आयोजित करण्यात येणारे सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता मंदिरातील महाराजांचे नित्य पूजा, आरती वगळता सर्व धार्मिक कार्यक्रम व भाविकांच्या वतीने होणारे पूजा विधी अजूनही बंदच आहेत.
मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या माध्यमातून मंदिरात व अक्कलकोट शहर व परिसरात कोरोना संसर्ग बळावू नये यासाठी मंदिर समितीच्या वतीने सर्व प्रकारच्या शासकीय नियमांचे पालन करण्यात येत आहे. येणाऱ्या भाविकांना मंदिर व परिसरात सॅनिटायझरची सोय करण्यात आली आहे. मंदिरात प्रवेश करणाऱ्या भाविकांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. ध्वनिक्षेकाद्वारे व देवस्थानच्या सुरक्षा रक्षकांच्या वतीने नित्यपणे व सातत्याने तशा सूचना भाविकांना करण्यात येत आहेत.
----
भाविक शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करताना दिसून येत आहेत. श्रींच्या दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात आल्यानंतर एकमेकांच्या संपर्कात न येता मास्क व सॅनिटायझरचा वापर करून ठराविक अंतराने स्वामींचे दर्शन घ्यावे. सुरक्षितपणे माघारी जावे, असे आवाहन मंदिर विश्वस्त समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले आहे.