वर्षभरात येणाऱ्या सर्व सणांना सर्वत्र गोडाधोडाचा स्वयंपाक करून आनंदोत्सव साजरा केला जातो; परंतु रंगपंचमीच्या सणाला पुरणपोळीच्या स्वयंपाकापेक्षा रंग खेळून आनंदोत्सवाला अधिक महत्त्व आहे. यामध्ये आबालवृद्ध सहभाग घेऊन आपले मित्र, मैत्रिणी, नात्यागोत्यांतील मंडळींसमवेत रंग खेळून आनंद द्विगुणित करतात. मागील तीन-चार वर्षांपासून ओल्या रंगामुळे शरीरावर होणारे परिणाम टाळण्यासाठी कोरडे रंग खेळण्याची प्रथा सुरू झाली; परंतु मागील वर्षीपासून कोरोनाच्या संसर्गामुळे रंगपंचमीच्या सणावर विरजण पडल्याचे पाहावयास मिळाले.
रंगपंचमीचे महत्त्व
फाल्गुन कृष्ण पंचमी या तिथीला रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. अलीकडील काळात रासायनिक रंंगांंचे दुष्परिणाम पाहता नैसर्गिक रंंग वापरून हा दिवस साजरा करण्याचे प्रमाणही वाढले आहे. या निमित्ताने बाजारात रंगांची दुकाने सजतात. पूर्वी होळी म्हटले की फुलांच्या पाकळ्या, मेहंदी, गुलमोहराची पाने, टोमॅटो, हळद, डाळीचे पीठ अशा हर्बल पदार्थांपासून रंग तयार केले जायचे. या रंगांमुळे रंगपंचमीचा आनंद द्विगुणित होई. द्वापार युगात गोकुळात बालकुमार कृष्ण आपल्या सवंगड्यांवर पिचकारीने रंगीत पाणी उडवी व उन्हाची रखरख कमी करीत असे. तीच प्रथा आजही रंगपंचमीच्या रूपाने चालू आहे.