सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील संशयित रुग्णांसाठी बरूर येथील बीएसएफ कॅम्पसच्या इमारती ताब्यात घेण्यात आल्या आहेत. या ठिकाणी ५०० रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर स्थापित करण्यात येणार आहे.
कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर खबरदारी घेतली जात आहे. याबाबत तालुकास्तरीय अधिकाºयांची बैठक सोलापूर विभागाच्या उपविभागीय अधिकारी ज्योती पाटील-नाईकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. दक्षिण सोलापूरचे तहसीलदार अमोल कुंभार, मंद्रुपच्या अतिरिक्त तहसीलदार उज्ज्वला सोरटे, बीडीओ राहुल देसाई यांच्यासह प्रमुख अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोविड केअर सेंटरची उभारणी करण्याचे निश्चित झाले़ त्यासाठी तालुक्यातील सार्वजनिक इमारतींचा आढावा घेण्यात आला़ बरुर येथील बीएसएफ ट्रेनिंग सेंटरच्या कॅम्पसमधील बहुमजली इमारती त्यासाठी ताब्यात घेण्याचा निर्णय झाला़ या कॅम्पसमध्ये सात बहुमजली इमारती आहेत़ या ठिकाणी ५०० संशयित रुग्णांची व्यवस्था करण्यात येणार आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यात एकाच ठिकाणी ही व्यवस्था करण्यात येणार आहे़ कुंभारी, वळसंग , बोरामणी, कासेगाव या परिसरातील संशयित रुग्णांनाही याच सेंटरवर उपचारासाठी दाखल करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती तहसीलदार अमोल कुंभार यांनी दिली.
या कोविड केअर सेंटरमध्ये कोरोना संशयित तसेच बाधित रुग्णांसाठी ओपीडी, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्याची व्यवस्था केली जाणार आहे.--------------विलगीकरणासाठी लोकमंगलची निवासस्थाने- विलगीकरणासाठी भंडारकवठे येथील लोकमंगल अॅग्रो इंडस्ट्रीज साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर अधिकाºयांसाठी बांधलेली निवासस्थाने सध्या रिकामी आहेत. या निवासस्थानात विलगीकरणासाठी रुग्ण ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे, मात्र लोकमंगलची इमारत घेण्याबाबत संबंधितांशी अद्याप चर्चा झाली नसल्याचे उपविभागीय अधिकारी ज्योती पाटील-नाईकडे यांनी सांगितले.