मुंबई/सोलापूर - देशभरात कोरोनावर मात करण्यासाठी पंतप्रधानांनी लॉकडाऊनची घोषणा करताच, पोलिसांनी रस्त्यावर उतरणाऱ्या लोकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. नागरिकांमध्ये धाक राहावा, यासाठी पोलिसांनी मारहाण केल्याच्या अनेक घटना घडल्या. या मारहाण केल्याच्या अनेक घटना व्हिडिओच्या माध्यमातून समोर येत आहेत. अनेक ठिकाणी नागरिक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची होताना दिसत आहे. कुठे पोलिसांचा अतिरेक होतंय. तर, कुठे पुढारपणाही केल्याचं दिसून येतंय. पंढरपूरात पोलिसांनी पुढारपण करणाऱ्या माजी शिवसेना नेत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात शिवसेनेच्या माजी उपजिल्हाप्रमुखाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मी अध्यक्ष आहे... तुम्हाला बघून घेईल, तुम्ही मला ओळखलं नाही का? असे म्हणत पोलिसांच्या अंगावर आल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख महेश साठे यांच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंढरपूर पोलीस उपविभागीय पोलीस अधिक्षक डॉ. सागर कवडे, हवालदार बिपीन ढेरे, पोलीस नाईक अभिजीत कांबळे व इतर कर्मचारी कोरोनाबाबत माहिती देऊन जनजागृती करत घराबाहेर न पडण्याचे आवाहन करत होते.
पोलीस आणि बंदोबस्तावरील कर्मचाऱ्यांचे काम सुरू असताना, लक्ष्मी-टाकळी उपनगरातील आनंदनगर बोर्डाजवळ काही लोक थांबलेले दिसले. त्यावेळी, पोलिसांनी त्याठिकाणणी जाऊन लॉकडाऊनची माहिती देत, घरी जाण्यास बजावले. यावेळी माजी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश साठे हे पोलिसांच्या अंगावर धावून गेले. तसेच, मी अध्यक्ष आहे... तुम्हाला बघून घेईल... असे म्हणत शासकीय कामात अडथळा निर्माण केला व पोलिसांच्या अंगावर धावून गेला. त्यामुळे महेश साठे यांच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल पंजाब सुर्वे यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी महेश साठे यास न्यायालयात हजर केले असता, त्यांस एक दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
देशात २१ दिवसांचा लॉक डाऊन करण्यात आल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून भितीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे, जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी नागरिक घराबाहेर येत आहेत. त्यातच, विनाकारण गाडीवर फिरणाऱ्यांना पोलिसांच्या काठ्यांचा प्रसाद खावा लागतोय.