सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथील शिक्षकाला संसर्गातून कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल येताच सोलापूर तालुका पोलीस व आरोग्य विभागाचे पथक नान्नजमध्ये पाठविल्याची जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ भिमाशंकर जमादार यांनी दिली.
नान्नजमधील शिक्षकास पोटाचा त्रास असल्याने ४ जून रोजी सोलापुरातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र तेथे उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूर मार्केडेय हॉस्पीटल येथे दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच कोरोना टेस्टसाठी स्वॅब घेण्यात आले होते, मंगळवारी सकाळी स्वॅबचा अहवाल प्राप्त झाला त्यात त्या शिक्षकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमादार यांनी सांगितले.
दरम्यान, पोलीस व आरोग्याचे पथक दाखल होताच संबंधित कोरोना बाधित शिक्षक शेतात राहत आहेत, त्यांच्या आजुबाजूला एकही घर नसल्याने प्रतिबंधक क्षेत्र करण्यात आले नसल्याचेही सांगण्यात आले, मात्र पोलीस व आरोग्य पथकाने त्यांच्या कुटुंबियांना क्वारंटाइन केले.