श्रीपूर : कोरोनामुळे शाळांना सुट्ट्या दिल्या आहेत. विद्यार्थ्यांनी सुट्टीचा सदुपयोग करावा, विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेत खंड पडू नये, यासाठी मुंडफणेवाडी झेडपी शाळेतील शिक्षकांनी पालकांच्या सहाय्याने घरीच बसून विविध शैक्षणिक अॅप व यू-ट्यूबद्वारे ऑनलाइन धडे देण्याचे काम हाती घेतले आहे.
माळशिरस तालुक्यातील महाळुंग केंद्रांमधील मुंडफणेवाडी झेडपी शाळा द्विशिक्षकीय शाळा आहे. शाळेचा पट ३७ असणाºया शाळेमध्ये सुरुवातीपासून आधुनिक पद्धतीने डिजिटल क्लासरूम तयार करून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. या शाळेतील मुख्याध्यापक समीर लोणकर व शिक्षिका अर्चना वाघ यांनी स्वखर्चाने डिजिटल क्लासरूम उभा करून मुलांना आधुनिकतेचे धडे दिले जात आहेत. यासाठी त्यांनी स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप आदी साहित्य स्वखर्चातून आणून त्याद्वारे ई-लर्निंगच्या माध्यमातून मुलांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्याचे काम केले जात आहे.
पालकांचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून त्यांना वेगवेगळे अभ्यासक्रम ऑनलाइन टेस्ट तसेच ब्लॉगद्वारे मुलांना ई-साहित्याची माहिती दिली जाते.
असा शिकवला जातो ऑनलाइन अभ्यासक्रम- जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांकडे स्मार्ट मोबाईल फोन आहेत. त्याच्या माध्यमातून एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून त्यामध्ये विविध शैक्षणिक अॅप व यूट्यूबच्या माध्यमातून आॅनलाईन अभ्यासक्रम शिकवला जातो. तसेच या शाळेतील मुलांना ग्रुपद्वारे दररोज गृहपाठसुद्धा दिला जातो. मुले तोच पूर्ण केलेला गृहपाठ ग्रुपवर टाकतात. तसेच अभ्यासामध्ये मुलांना काही शंका असेल तर व्हिडिओ कॉलद्वारे त्या शंका सोडविण्याचे काम केले जाते. त्यामुळे शाळा बंद असली तरी मुले गोडीने अभ्यास करतात याची माहिती मुख्याध्यापक समीर लोणकर यांनी दिली.
कोरोनामुळे मुलांना सुट्टी मिळालेली आहे. त्याचा चांगला उपयोग करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुंडफणेवाडी येथील शिक्षकांनी चांगला उपक्रम राबवला आहे. त्यामुळे घरी बसून मुले आॅनलाईन अभ्यासक्रमाचा आनंद घेतात.