सोलापूर : आंत्रोळीकर नगर भाग ३ येथील एका बंगल्यात व्यापाऱ्याच्या घरात धाड टाकून करण्यात आलेल्या सट्टा कारवाईत एक डायरी जप्त करण्यात आली आहे. डायरीमध्ये वेगवेगळ्या नावाच्या पुढे किमान दोन ते जास्तीत जास्त ५० लाखांच्या पैशाचा आकडा लिहिण्यात आला आहे. सट्ट्याचे कनेक्शन हे राजस्थान, आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यातील बुकींशी कनेक्शन असल्याचा संशय असून गुन्ह्यातील अन्य सहा जणांचा शोध सुरू आहे.
ऑस्ट्रेलिया येथे सुरू असलेल्या बिग बॅश लीग (बीबीएल) क्रिकेटवर ऑनलाइन सट्टा सुरू होता. दरम्यान, पोलीस आयुक्तांच्या भरारी पथकाने सोमवारी धाड टाकली होती. धाडीत सट्टा लावण्यासाठी लॅपटॉप, टॅब व हॉटलाइन मशीनसह वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले. यामध्ये एक डायरीही मिळाली आहे. डायरीमध्ये पैसे जमा केलेल्या लोकांची यादी असून त्यांच्या नावापुढे रक्कम लिहिण्यात आली आहे. रक्कम लाखातील असून एका नावासमोर ५० लाखांचा आकडा लिहिण्यात आला आहे. सट्टा प्रकरणी व्यापाऱ्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाच जणांना अटक झाली आहे. सट्टा बहाद्दरांचे कनेक्शन राजस्थान, आंध्र प्रदेश, कर्नाटक आदी राज्यांतील बुकीशी असल्याचे समोर येत आहे.
अटक झालेल्यांची नावे
० चंदन अविनाश पंजाबी (वय ३९, रा. अंत्रोळीकर नगर भाग ३ प्लॉट नं.१४), तीर्थराज सुरेश अक्कलकोटकर (वय ४३, रा. सुशील नगर, भारती विद्यापीठ, विजापूर रोड), सम्राट प्रकाश माने (वय ३३, रा. गुलमोहर अपार्टमेंट, फ्लॅट नं.२०३, वसंत विहार, मुरारजी पेठ), राजेश सिद्राम वाघमोडे (वय ३६, रा. पूर्व क्षत्रिय गल्लीमधला मारुती मंदिर जवण), शिवनाथ सुवर्णकुमार हुडे (रा. सोलापूर) यांना अटक झाली आहे.
हवाला मार्गे होते पैशांची देवाणघेवाण
० धाड टाकल्यानंतर ४८ मोबाइल जप्त करण्यात आले. रोख रक्कम केवळ ५ हजार ५०० मिळाली. मात्र सर्व व्यवहार हा ऑनलाइन गुगल पे, फोन पे, पेटीएमद्वारे होतो का हे पाहात होते. लॅपटॉप, टॅबचा वापर करत असताना आरोपींनी साहेब कोणतेही ऑनलाइन व्यवहार आम्ही करत नाही. आमचा सर्व व्यवहार हवालाद्वारे होतो. त्यामुळे बाकीच्या गोष्टी पाहण्यात काही अर्थ आही, असे सांगितले असल्याचे समजते.