देशातील प्रत्येक माणूस वेगवेगळ्या प्रश्नांनी आज अस्वस्थ आहे. ज्याच्या घरात मुलगी, बायको, सून आहे. त्या रोज कामासाठी, शाळेत किंवा इतर गोष्टीसाठी घराबाहेर जातात. आज अस्वस्थ आहेत ती घरात येईपर्यंत. कोणतेही वृत्तपत्र उघडा अत्याचार, जाळपोळ,अपघात, आंदोलने, उपोषणे, नक्षलवादी गोळीबार, सैनिकांचा मृत्यू व या सर्वांवर कहर नेत्यांची, पुढाºयांची बेताल वक्तव्ये. कशाचा कशाला मेळ नाही. अशा गोष्टीमुळे प्रत्येकाचे मन अस्वस्थ आहे.
एकापाठोपाठ एक भयंकर घटना घडत आहेत. हिंगणघाटमध्ये पेट्रोल टाकून एका प्राध्यापिकेला जाळण्याचा प्रयत्न केला तर तसाच प्रकार औरंगाबादमध्ये, लातूरमध्ये, पनवेलमध्ये घडला. या सर्व घटना ऐकून मन अगदी सुन्न झाले. एवढी विकोपाची विकृती का? स्त्रियांचा जीव एवढा स्वस्त झालाय का? की पुरुषांमधलं माणूसपण संपत चाललंय? प्रत्येक जीवाप्रती देखील आता केवळ यूज अॅण्ड थ्रो एवढीच भावना राहिली आहे का? समाजातील एक घटक म्हणून आपणच कुठेतरी कमी पडतो आहे का? अशा असंख्य प्रश्नांनी काळजात गर्दी केली आहे.
जगातील मोजक्या महासत्तापैकी एक असणाºया या देशात अनेक प्रश्नांनी सामान्य जनता अस्वस्थ आहे. राष्ट्रीय अपराध रेकॉर्ड ब्युरो आकडेवारीच्या आधारे २०१८ मध्ये ३,७७,२७७ गुन्हे दाखल झाले असून, त्यामध्ये स्त्री अत्याचाराबाबत सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद आहे. देशात स्त्री अत्याचाराबाबत उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्राचा दुसरा नंबर लागतो. देशात १५.७ टक्के गुन्ह्यांपैकी ९.४ टक्के गुन्हे महाराष्ट्रातील आहेत. देशामध्ये जवळ-जवळ ४० हजार अत्याचारांची नोंद आहे. त्यामधील दोन हजारांच्यावर महाराष्ट्रात घडलेले आहेत. आज काळजात आग पेटून माणूस अस्वस्थ का आहे. कारण त्यांच्यावर झालेल्या अत्याचारामुळे नाही तर त्यांच्यावर अमानुष अत्याचार करणारे ते अजून जिवंत आहेत त्याच्यामुळे.
हल्ली प्रत्येक माणूस घाईत दिसतो. घाईत असताना किंवा अनवधानाने अपघात होतो. अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्त विव्हळत पडलेली असतात. त्यावेळेस तरुणपिढी कोणी फोटो काढते... तर कोणी व्हिडिओ... एवढ्यावरच थांबत नाहीत पहिल्यांदा सोशल मीडियावर कोण टाकेल याची स्पर्धाच लागलेली असते. अशा अनेक घटनांमुळे अस्वस्थ आहे. नेमकं काय होत आहे, ते सांगता येत नाही. काहीवेळा प्रकृतीची जी अवस्था असते, तशीच आज देशाची अवस्था आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला होत काहीच नसतं, पण बेचैनी असते. स्वस्थ वाटत नाही. आजार असा कोणता नसतो, पण उत्साह वाटत नाही. काहीतरी बिनसल्यासारखे वाटते. चैन पडत नाही. दिवस ढकलायचा म्हणून ढकलला जातो. अशी अवस्था आज प्रत्येकांच्या मनात आहे. अशावेळी नेमकं काय करायचे? यामुळे ही अस्वस्थ आहेत.
सामाजिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास वेगवेगळ्या संसाधनाचा अतिवापर, माणसांचे एककल्ली विचार, पुरुषी मानसिकता, विषम स्त्री-पुरुष जन्मदर, अतिघाई आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सोशल मीडिया अशा अनेक कारणामुळे ही प्रकरणे घडत आहेत. रोजचा दीड जीबी मोबाईलचा डाटा आज बेरोजगार मुलांना बेरोजगार असल्याची जाणीव होऊ देत नाही. शहरातल्या मुलांना हे मनोरंजनाचे चांगले माध्यम मिळाले आहे. पण त्याचा वापर चांगल्या कामासाठी न होता वाईट कामासाठी जास्त दिसतो. सध्या देश धर्म, जात, वंश, प्रदेश अशा सर्वच पातळीवर भेदाभेदाचे राजकारण केलं जाऊन त्याला जातीय रंग दिला जातो.
प्रत्येकवेळी सरकारी यंत्रणाच मदतीला आली पाहिजे हा विचार डोक्यातून काढून आपण स्वत:पासून सुरुवात केली तर अस्वस्थ वाटणार नाही. आपल्या देशाला केवळ संख्येने मोठे करायचे नाही. तर उच्च मानवी मूल्यांचे पालन करून आपल्या देशाला विकासात भराभर पुढे न्यायचे आहे. तिथे सर्वधर्माचा अहंकार गळून पडेल. अत्याचारीला योग्य शिक्षा होईल, जातीभेद शिल्लक राहणार नाही. आपण सगळे भारतीय आहोत आणि या भारताला मोठे करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे, अशी सर्वोच्च भावना जिथे निर्माण होईल, त्याच दिवशी देशातली अस्वस्थता संपेल. - प्रा. तात्यासाहेब काटकर (लेखक शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत)