पंढरपूर : कार्तिकी एकादशी निमित्त होणाऱ्या श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मानाचा वारकरी म्हणून कोंडीबा देवराव टोणगे (वय ५८) व पऱ्यागबाई कोंडीबा टोणगे (वय ५५, रा. निळा, सोनखेड, ता.लोहा, जि.नांदेड)या दापत्याची निवड झाली आहे . यामुळे टोणगे दाम्पत्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विठ्ठलाची शासकीय महापूजा करता आली आहे.
कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठलाच्या शासकीय महापूजेवेळी मानाचा वारकरी विठ्ठलाच्या दर्शन रांगेतून निवडला जातो. व त्यांना शासकीय महापूजेची संधी दिली जाते. तथापि कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता, मागील कार्तिकी यात्रा मर्यादित व प्रतिकात्मक स्वरूपात साजरी करण्यात आली होती.
तसेच श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद आहे. त्यामुळे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात २४ तास पहारा देणारे विणेकरी यांची उपमुख्यमंत्री महोदयांच्या शुभहस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेसाठी मानाचा वारकरी म्हणून मागील कार्तिकी एकादशीला निवड करण्याचा मंदिर समितीने निर्णय घेतला होता.
परंतु यंदा कार्तिकी यात्रा करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. विठ्ठलाचे मुखदर्शन देखील सर्वांसाठी खुले केले आहे. त्यामुळे पुन्हा यावर्षीपासून उपमुख्यमंत्र्यांसह विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्याचा वारकरी म्हणून दर्शन रांगेतील भाविकांची निवड करण्यास सुरुवात झाली आहे.
यंदाच्या वर्षी हा मान कोंडीबा देवराव टोणगे (वय ५८) व पऱ्यागबाई कोंडीबा टोणगे (वय ५५, रा. निळा, सोनखेड, ता.लोहा, जि.नांदेड) यांना मिळाला असून हे पती-पत्नी मागील तीस वर्षापासून विठुरायाचे यात्रा करत असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.