डॉ. कसपटे यांनी १९९५ पासून संशोधन करून एनएमके १ गोल्डन ही जात विकसित केली. मात्र त्याचा गैरफायदा घेण्यासाठी परिसरातील काही लोकांनी या नावाने बनावट रोपांची निर्मिती करून शेतकऱ्यांची फसवणूक करावयास सुरुवात केली. त्याला आळा घालण्यासाठी डॉ. कसपटे यांनी या जातीची पीकवाण संरक्षण व शेतकरी हक्क कायद्यानुसार नोंदणी केली. सर्व रीतसर प्रक्रिया केल्यानंतर त्यांना या वाणाचे पेटंट मिळाले. या वाणावर आता त्यांचा स्वामित्व हक्क प्रस्थापित झाला आहे. असे असतानाही गोरमाळे, वाणेवाडी व अन्य गावांतील बनावट रोपनिर्मिती करणाऱ्या नर्सरींनी त्यांच्याकडून कसलाही परवाना न घेता बनावट रोपांची निर्मिती व विक्री चालूच ठेवली. त्यामुळे डॉ. कसपटे यांनी या बेकायदेशीर नर्सरीचालकांना कायम मनाई करावी. त्यांनी केलेल्या अप्रामाणिक कृत्यामुळे झालेल्या नुकसानीची सुमारे ५० लाख भरपाई मिळावी, या मागणीसाठी न्यायालयात धाव घेतली. त्यातील काही प्रकरणांत झालेल्या सुनावणीत न्यायालयाने प्रतिवादींना म्हणणे सादर करण्याचा आदेश दिला. तोपर्यंत त्यांना सीताफळ रोपांची निर्मिती व विक्री करण्यास मनाई केली आहे.
सीताफळाची अवैध रोपवाटिका चालविणाऱ्यांना न्यायालयाचा प्रतिबंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 5:01 AM