सोलापूर - आतापर्यंत झालेल्या सुनावनी दरम्यान कोणत्याही न्यायालयाने सोलापूरच्या विमानसेवेला सिध्देश्वर साखर कारखान्यांच्या चिमणी अडथळा ठरत नाही, ती त्वरीत पाडून विमानसेवा सुरू करा असा आदेश दिलाच नाही. तरीही काही मंडळी ठरवून प्रशासनाची दिशाभूल करीत असल्याचे कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी यांनी सांगितले.
श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबतची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे संचालक विठ्ठल वानकर, सिध्दाराम चाकोते, अमर पाटील, कार्यकारी संचालक समीर सलगर यांच्यासह आदी संचालक मंडळ उपस्थित होते.
पुढे बोलताना धर्मराज काडादी म्हणाले की, १९७१ साली कारखान्याची स्थापना झाली, १९८६ साली विमानतळावर सेवा सुरू झाली. वास्तविक सोलापुरात वर्षाला ५०० हून अधिक विमाने येतात. शिवाय पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल, राज्याच्या विविध मंत्र्यांचे विमाने, हेलिकॉफ्टर याच होटगी विमानतळावरून ये-जा करतात. दरम्यान, सिध्देश्वरच्या चिमणीचा होटगी रोडवरील विमानसेवा सुरू करण्यास कोणत्याही प्रकारचा अडथळा ठरत नाही, सोलापुरातील काही लाेक प्रशासनाची दिशाभूल करून सिध्देश्वरचे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही काडादी यांनी सांगितले.
--------------
म्हणून मी त्यावेळी लेखी लिहून दिले....
सिध्देश्वर कारखान्याची चिमणी पाडण्यासाठी प्रशासनाने कारवाईची सुरूवात केली, मोठा पोलिस फौजफाटा आणला होता, मात्र शेतकर्यांनी या चिमणी पाडकामाला विरोध केला, त्यावेळी काही शेतकरी सभासद चिमणीवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत होते, सभासदाही आक्रमक झाले होते, काही लोक जेसीबीच्या समोर झाेपले होते, मात्र कोणाच्याही जिवितेला धोका निर्माण होऊ नये म्हणून मी व कार्यकारी संचालकांनी आम्ही चिमणीला पर्यायी जागा बघून हलवू अन्यथा पाडू असे लेखी लिहून दिले होते असेही चेअरमन धर्मराज काडादी यांनी सांगितले.