सोलापूर :अनलॉकनंतर वीज बिल वसुलीला परवानगी मिळाली असली तरी वीज बिल माफ होईल, या आशेने ग्राहक बिल भरण्यास तयार होईनात. अशातच महावितरणचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे.एरव्ही बिलाची थकबाकी राहिली तर ग्राहकांची जोडणी कापली जायची; पण कोरोना काळाने महावितरणच्या वसुली धोरणातही नरमता आली आहे. कंपनीचे कर्मचारी व अधिकारी ग्राहकांना सौजन्यशीलतेने बिल भरण्याची विनंती करताना दिसून येेत आहेत.
कोरोनाकाळात सर्वकाही बंद होते, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह कारखानदारांची आर्थिक घडी विस्कटलेली होती. त्यामुळे ग्राहकांनी वापरलेल्या वीज बिलांची वसुली करण्यास शासनाने स्थगिती दिली. त्यामुळे महावितरणचे प्रचंड नुकसान झाले. अशातच अतिवृष्टीमुळे घरगुती ग्राहकांसह शेतीपंपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कोरोनासारखी गंभीर परिस्थिती व अतिवृष्टीसारखं संकट असताना महावितरणने मोठ्या धैर्याने ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करण्याचा प्रयत्न केला अन् यशस्वी झाला. कोरोनाकाळात फोनव्दारे तक्रार घेऊन ग्राहकांच्या तक्रारीचे निराकारण केले, मोबाईलवरून रीडिंग पाठविणे, एसएमएसव्दारे बिल, ऑनलाइन वीज बिल भरणा, वीजपुरवठा खंडित झाल्यास स्काडाप्रणालीच्या माध्यमातून आवश्यक त्याठिकाणी दुरुस्तीची कामे केली.
कोरोना अन् अतिवृष्टीतून वीजमंडळ सावरतेय...
कोरोनाकाळात वीज बिल वसुली झाली नाही. आधीच नुकसानीत असलेल्या महावितरणचे अतिवृष्टीने १३ ते १५ कोटींचे नुकसान केले. वीज बिल वसुलीला शासनाने स्थगिती दिल्याने महावितरणच्या वसुलीच्या मोहिमा बंद करण्यात आलेल्या आहेत. शासनाने नुकसानीपोटी भरपाईची रक्कम दिली असली तरी थकबाकी वसुलीचे मोठे आव्हान आता महावितरणसमोर आहे. मात्र कोरोना व अतिवृष्टीच्या काळातील नुकसानीतून महावितरण आता हळूहळू सावरू लागलेले आहे.
कोरोना अन् अतिवृष्टीने महावितरणचे मोठे नुकसान झाले. कोरोनाकाळातही जिवाची पर्वा न करता महावितरणचे अधिकारी, कर्मचारी, जनमित्रांनी रात्रंदिवस काम करून सुरळीत वीजपुरवठा करून ग्राहकांना मोठा दिलासा दिला. कोरोनानंतर महावितरणमध्ये डिजिटल व पेपरलेस कारभारावर अधिकचा भर दिला आहे.
- ज्ञानदेव पडळकर,
अधीक्षक अभियंता, महावितरण, सोलापूर मंडल