कोरोना महामारीची दुसरी लाट रोखण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न केले जात असताना ग्रामीण रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मागील वेळी याठिकाणी सेंटर सुरू केले होते. त्यावेळी बाह्यरुग्ण विभाग इतरत्र स्थलांतरित केला होता . यावेळी पुन्हा याठिकाणी कोविड सेंटर सुरू केले मात्र बाह्यरुग्ण विभाग ‘जैसे थे’ ठेवल्यामुळे कोविड पॉझिटिव्ह व निगेटिव्ह नागरिकांचा संपर्क येत आहे. सहाजिकच ये जा करणारे शेकडो नागरिक सध्या भीतीच्या वातावणात वावरत आहे.
असा खेळला जातोय खेळ
बाह्यरुग्ण विभागात दररोजची ६० ते ७० न्याय वैद्यकीय तपासणी, रक्त लघवी तपासणी, वयोवृद्धांचे डोळे तपासणी सुरु असते. यातूनच कोविड पॉझिटिव्ह रुग्ण केअर विभागात जातात. या विभागात १३ पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. आरोग्य कर्मचारी दोन्ही वार्डात ये-जा करतात. याशिवाय नव्याने संशयित असलेल्या अनेक रुग्णांचा वावर बाह्यरूग्ण विभागाच्या रुग्णांमध्ये सर्रास होत आहे. यामुळे माळशिरस ग्रामीण रुग्णालयातील उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे.
याबाबतीत माहिती घेण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे संपर्क साधला असता त्यांनी फोन घेणे टाळले.
सध्या जागेअभावी बाह्यरूग्ण विभाग व कोविड केअर सेंटर जवळ जवळ आहे. याबाबत आम्ही वरिष्ठ कार्यालयास पत्रव्यवहार केला आहे. शिवाय आम्ही दोन्ही विभागातील रुग्णांना काळजी घेण्यासाठी सांगून एकत्र येऊ नये यासाठी काळजी घेत आहोत.
-
डॉ. स्मिता शिंदे , प्रभारी वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रूग्णालय.
१५माळशिरस
माळशिरसच्या ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर व बाह्य रुग्ण विभागात ये जा करणारे नागरिक.
----