तालुक्यातील ११७ गावांत कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात बाधित रुग्णांनी उच्चांक गाठला होता. यादरम्यान सुमारे १६ हजार बाधित रुग्ण तालुक्यात आढळून आले होते. सद्यस्थितीत १८३ जण ॲक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. तेही काही दिवसांतच आटोक्यात येऊन तालुक्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे होत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
माढा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय, माढा व कुर्डूवाडी, रेल्वे हॉस्पिटल, कुर्डूवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, मोडनिंब, टेंभुर्णी, पिंपळनेर,उपळाई (बु.),परिते, आलेगाव, मानेगाव, रोपळे ( क.) या ११ सेंटरद्वारे गेल्या तीन महिन्यांत लसीकरण करण्यात आले.
आरोग्य विभागाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे कोविड लसीकरण जिल्ह्यात उत्कृष्ट ठरले आहे. सध्या येथून तरुणांना वाव मिळत आहे. त्यांची गर्दी सर्व सेंटरवर दिसत आहे. तरुणांना लसीकरण करताना सरकारी ॲपवरून त्याची पूर्वनोंदणी करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे त्यात ज्या तरुणांचे नाव नोंदणी होईल, अशांनाच लस देण्यात येईल, असे आरोग्य विभागातून सांगण्यात आले.
-----
असे झाले लसीकरण
लसीकरणात आरोग्य विभागाशी संलग्न असणारे संपूर्ण कर्मचारी - ३,३७४, फ्रंटलाईन वर्कर- ५,३३३, पंचायत समिती, नगर पालिका, ग्रामपंचायत यातील - ६२५ कर्मचारी, १८ ते ४५ वयोगटातील तरुण -२,५९६, दुर्धर आजारातील ४५ वयोगटाच्या वरील -१५,७५३, वयोवृद्ध ६० वयोगटाच्या वरील - १८,२९८ अशा पद्धतीने आतापर्यंत माढा तालुक्यात एकूण ४५,९७९ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.
-----
माढा तालुका कोविड लसीकरणामध्ये जिल्ह्यात अग्रेसर आहे. आतापर्यंत ४५ हजार ९७९ जणांना लसीचा डोस देण्यात आला. सध्या तरुणांचे लसीकरण करण्यास सुरुवात केली असून, त्यात ॲपवरूनच नोंदणी आवश्यक आहे. त्यानंतर संबंधीत सेंटरमधून त्याना लस दिली जाईल.
- डॉ. शिवाजी थोरात, तालुका आरोग्य अधिकारी, माढा
----