सोलापूर : पंढरपूर तालुक्यात आंबे येथे आनंदा इंगोले यांच्या गायीवर हिंस्र प्राण्याने हल्ला केला. या हल्ल्यात गाय मृत्युमुखी पडली. याच हिंस्र प्राण्याने सोमवारी चळे येथील बापू गजानन बनसोडे यांचे दोन बोकड मारले, तर दोन शेळ्या जखमी केल्या. ही घटना ताजी असताना मंगळवारी आंबे येथील शेतकरी आनंदा यांच्या वस्तीवर गायीवर हल्ला केला. याशिवाय सुस्ते, चळे, आंबे, मुंडेवाडी या भागात बिबट्यासदृश प्राण्याने आतापर्यंत १९ जनावरांवर हल्ला केला आहे.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये या प्राण्याविषयी भीती निर्माण झाली आहे. या घटनांनतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मात्र मृत जनावरांचे फक्त पंचनामे करण्याचे काम केले आहे. याबाबत कोणतीही कारवाई झालेली नाही. यावर उपायात्मक कॅमेरा लावणे, पिंजरा बसवणे अशी कोणतीही हालचाल झालेली नाही.
वनविभाग व पशुसंवर्धन विभागाच्या वतीने नदीकाठ परिसरातील शेतकऱ्यांनी शक्य असेल त्यांनी आपल्या शेळ्या, करडे व लहान वासरं बंदिस्त करून ठेवावीत असे आवाहनही करण्यात आले आहे. वन विभागाचे सचिन कांबळे, वनसेवक अतुल सावंत, युवराज काळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. याबाबत वरिष्ठांना अहवाल पाठवला आहे.
आतापर्यंत १९ जनावरांवर हल्ला..हिंस्र प्राण्याने पंढरपूर तालुक्यात चळे आणि आंबेगाव परिसरात धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत त्याने १९ जनावरांवर हल्ला केला आहे. याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत असून, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सध्या चळे आणि आंबे परिसरातील शेतकरी रात्रभर जागरण करून जनावरांचे संरक्षण करीत आहेत. काही शेतकरी रात्रीच्या वेळी मोठ्या आवाजाचे फटाके फोडून त्याला वाड्यावस्त्यांवर येण्यापासून रोखत आहेत.