सोलापूर : करमाळा तालुक्यात शेटफळ येथील परमेश्वर पोळ या हौशी शेतकऱ्याने लाडक्या गायीचा डोहाळ जेवणाचा कार्यक्रम धूमधडाक्यात केला आहे. यानिमित्ताने गाव जेवण घालून संध्याकाळी भजनाचा कार्यक्रम आयोजित केला.
ग्रामीण भागात एक म्हण प्रचलित आहे. ‘हौसेला मोल नसते’ म्हणजे जर एखाद्या गोष्टीची हौस करायची असेल तर खर्च किती होईल याचा विचार केला जात नाही आणी हौस करणारा शेतकरी असेल तर मग तर विचारूच नका. अशाच शेटफळ येथील हौशी शेतकरी परमेश्वर गोरख पोळ यांनी चक्क आपल्या लाडक्या गायीच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम आयोजित करून चकीतच केले. यानिमित्ताने त्यांनी सर्व पाहुणे मंडळींना निमंत्रण पाठविले. गावातील सर्व महिलांना शेतातील गोठ्यावर बोलवून डोहाळे जेवणाचा मोठा जंगी कार्यक्रम केला.
गोठ्यावर मंडप अन् विद्युत रोषणाई :
एखाद्या गरोदर महिलेचा ज्याप्रमाणे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होतो अशाच प्रकारे कार्यक्रम पार पडला. गोठ्यावर मंडप घालण्यात आला. विद्युत रोषणाई करण्यात आली. गायीला सजवून ओवाळण्यात आले. गायीसोबत फोटोसेशनही झाले. गायीला हिरवा चारा पंचपक्वानांचे जेवण घालण्यात आले. पाहुणे मंडळी, महिला व ग्रामस्थांनाही जेवणाचा बेत आखला. नंतर गावातील भजनी मंडळींचा भजनाचा कार्यक्रम झाला.