बाळकृष्ण दोड्डी, सोलापूर: महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाने आघाडीकडे राज्यातील दहा विधानसभा मतदारसंघांची मागणी केली असून याबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील, अशी माहिती माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी गुरुवारी पत्रकारांना दिली. गुरुवारी सकाळी दत्त नगर येथील माकप कार्यालयात वोट दो और नोट भी दो ही अभियान सुरू करण्यात आली. या वेळी आडम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निधी संकलन करण्यासाठी माकपचे कार्यकर्ते आता घरोघरी जातील. वोट सोबत आता नोटहीमागतील. ही पक्षाची जुनीच परंपरा असल्याची माहिती यावेळी आडम यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीत माकपने काँग्रेसचा प्रचार केला. त्यांना साथ दिली. काँग्रेसकडे आम्ही महाविकास आघाडीतून शहर मध्य विधानसभा मतदारसंघाची मागणी केली. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार यांची भेट घेतली. दोघेही सकारात्मक आहेत. आता शहर मध्य बाबत स्थानिक नेत्यांनी देखील शब्द पाळावा, अशी भूमिका माजी आमदार नरसय्या आडम यांनी मांडली.