अक्कलकोट - योग ही साधना असून माणसाचे आचार-विचार शुद्ध करणारे तंत्र आहे. शरीर आणि मनाच्या स्वच्छतेसोबतच बलशाली राष्ट्र निर्माण करण्याची ताकद योगमध्ये आहे. योगचा सृजनात्मक उपयोगच देशाला पुढे नेईल आणि उद्योगातून समृद्धी उभारण्यास सोबतच देशाला आर्थिक महासत्ता बनवेल, असे प्रतिपादन योगगुरू रामदेवबाबा यांनी केले.
अक्कलकोट येथे रामदेवबाबा यांच्या तीन दिवशीय योग शिबिराला आज प्रारंभ झाला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. हा भारताच्या दृष्टीने सुवर्णकाळ असून रोगमुक्ती आणि व्यसनमुक्तीकडे देश जात आहे त्याचे श्रेय योगालाच आहे. देशातील भ्रष्टाचार दूर करण्यासाठी योग शिक्षणाची गरज आहे. मनाची शुद्धता करण्याचे काम योग करतो. त्यातूनच भ्रष्टाचार थांबेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.