सोलापूर : मुलांच्या मनातील गणिताची भीती दूर व्हावी, यासाठी इयत्ता दुसरीतील गणिताच्या पुस्तकात अचानक संख्यावाचनात केलेल्या बदलामुळे शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. काहींनी अनुकूल तर काहींनी प्रतिकुल मत या बदलावर व्यक्त केले आहे. भाषा सौंदर्यावर जसा हा परिणाम करणारा बदल आहे, तसा व्यावहारिकदृष्ट्याही प्रतिकुल ठरेल अशी खंतही अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर हा नवा बदल घोकमपट्टीऐवजी समज वाढविणारा असल्याने स्वागतही झाले आहे.
नवी पद्धत दाक्षिणात्य असून इंग्रजीच्या धर्तीवर आहे. सुरुवातीला ही पद्धत गोंधळाची वाटत असली तरी गणिती कल्पकतेला वाव देणारी आणि भाषा सौंदर्यावर शून्य परिणाम करणारी ठरेल, असा विश्वासही गणित तज्ज्ञांचा आहे.
पारंपरिक संख्या वाचनाच्या पद्धतीतून अनेक पिढ्या शिकल्या आहेत. मग त्यांना जोडाक्षरे अन् गणिताची भीती नव्हती का? असा सवाल शिक्षकांचा आहे. गणिताची बडबड गीते आणि गाणे या पद्धतीमुळे नामशेष होतील. परिणामी, ही पद्धत भाषा सौंदर्यात कशी बसणार, अशी खंत काहींची असली तरी स्वागतही समपातळीवर आहे. याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमठल्या़
संकल्पना योग्य अन् स्वागतार्ह...नवी पद्धत गणिती कल्पकतेला वाव देणारी आहे. ही दाक्षिणात्य पद्धत आहे़ क्रमाने अंकवाचन आहे. सुरुवातीला गोंधळ वाटत असला तरी ही पद्धत चांगली आहे. भाषा सौंदर्यावर त्याचा काही परिणाम होणार नाही. स्थानिक किमतीनुसार अंकवाचन डावीकडून वाचले जाते. इथे क्रमाने वाचन होईल. हेतू सफल होतो़ -प्रकाश कुंभार,
एस़ के़ बिराजदार प्रशाला़
तज्ज्ञांची मते विचारात घेऊन बालभारतीने नवीन अभ्यासक्रम अंमलात आणला. त्याचे स्वागत व्हायला हवे. नव्या पद्धतीमुळे गणिताची भीती कमी होईल. अभ्यासकांचे आक्षेप नोंदवून आणि त्यावर चर्चा करुनच नवी पद्धत आलेली आहे. -सिकंदर नदाफ जिल्हा गणित अध्यापक मंडळ
नवी पद्धत विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अडचणीचीच आहे.यापूर्वी स्थानिक स्थळांचा वापर करून संख्यावाचन केले जात होते. आता संख्या वाचनाचे इंग्रजी भाषांतर आले आहे. हा बदल केवळ तांत्रिक आहे. शिवाय, २१ ते ९९ आकड्यापर्यंतच भाषांतर आहे. ११ ते २० अंकापर्यंत काहीच नाही. या वाचन पद्धतीतून प्रगल्भता अजिबात येणार नाही.
-महेंद्र बंडगर, जि़ प़ शाळा तेलगाव
मूळ संख्यानामात कायमस्वरुपी बदल न करता विद्यार्थ्यांना संख्या कळण्यासाठी संकल्पना स्पष्ट होण्यासाठी ही पद्धत योग्य आहे. या बदलात गणिती कल्पकतेला खूप चालना मिळेल.वीस-दोन अशी संकल्पना विद्यार्थ्यांना शिकविणे आणि त्यांना कळणे सोपे जाणार आहे काळानुसार अभ्यासक्रम बदल होणे गरजेचे आहे. - रमेश आदलिंगे, इंदिरा कन्या प्रशाला, मोहोळ
शिकविणाºयांना वळण जुने असते. त्यामुळे नवीन संकल्पना स्वीकारताना चुकल्यासारखे वाटते. परंतु, सवय झाल्यानंतर अंगवळणी पडते. संख्यावाचनाची नवी पद्धत अंगवळणी पडेल. त्यामुळे या पद्धतीचा इतका संभ्रम करण्याची गरज नाही. नवे धोरण-नव्या संकल्पना विचारपूर्वकच अंमलात आणल्या जातात. ते स्वीकारणे अपरिहार्य असते. भाषा सौंदर्य मात्र या नव्या पद्धतीतून लोप पावणार आहे. गणिताची बडबड गीते आणि गाणे कालबाह्य होतील, अशी भीती आहे. - रेखा पेंबर्ती, दमाणी प्रशाला
पारंपरिक संख्यावाचनाची पद्धत अतिशय उत्कृष्ट आहे. यातून भाषा सौंदर्य जोडाक्षरांचेही ज्ञान विद्यार्थ्यांना होते. नव्या पद्धतीमुळे संभ्रम निर्माण झालेला आहे. ७३ रुपये किलोने गोडेतेल घ्यायचे असेल तर ७०-३ म्हणायचे का? व्यावहारिकदृष्ट्या नवी पद्धत योग्य वाटत नाही. १ ते १०० पर्यंत आकडे लिहिण्याची व वाचण्याची जी पद्धत गॅझेटमध्ये आहे, तीच पद्धत अभ्यासक्रमात हवी. संबोध स्पष्ठता हवी़ - शिवराय ढाले, शेळगी, जिल्हा परिषद शाळा
एक्तीसऐवजी तीस-एक, बत्तीसऐवजी तीस-दोन असे वाचने म्हणजे एक्तीस, बत्तीस ही संख्येच्या नावाची मुळ ओळख नाहिशी करणे होय.दुसरीच्या संख्यावाचनातील बदल अनपेक्षित आहे. विद्यार्थ्यांना काही अंक लिहिता येत नाहीत म्हणून बालभारतीने संख्यावाचनात बदल करून संख्येच्या नावाची ओळख नाहिशी करण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे शिकविण्यासाठी अडचणीचे ठरेल. - शिवशरण बिराजदार, नवीन माध्य़ प्रशला, कणबस