कुर्डूवाडी : लव्हे येथे दहशत माजविल्यानंतर त्या बिबट्यासदृश प्राण्याने आता म्हैसगावकडे मोर्चा वळविला आहे. शुक्रवारी (दि.५) शिवाजी जगताप यांची रेडी त्याने फस्त केली, त्यानंतर शनिवारी (दि.६) एका कुत्र्याला फाडून खाल्ल्याने म्हैसगावातही दहशतीचे वातावरण पसरले आहे.
या बिबट्यासदृश प्राण्याने २७ जून रोजी लव्हे येथे दोन गायींना ओरखडा काढला होता, त्यानंतर दोन शेळ्या खाल्ल्या होत्या. लव्हे ते म्हैसगाव अंतर सुमारे ४ कि.मी. असून, सीना नदी ही लव्हे गावाहून म्हैसगावला येते. बिबट्या नदीकडच्या बाजूलाच असल्याची शक्यता म्हैसगावकरांनी यावेळी बोलून दाखविली.
लव्हे व म्हैसगावची शिव अवघी अडीच कि.मी.अंतराची असल्याने तो लव्हे येथीलच बिबट्या असल्याची चर्चा सुरु आहे. बिबट्यासदृश प्राण्याच्या दहशतीने म्हैसगावकरांनी गेल्या दोन दिवसांपाूसन आपली लहान मुले शाळेत पाठविणे बंद केले आहे. शेतमजूर महिलांनीही बिबट्याच्या दहशतीने शेतात काम करणे बंद केले असून, म्हैसगावात मजुरांची कमतरता भासत आहे.
आम्ही म्हैसगाव येथील घटनास्थळाची पाहणी केली़ आमचे वनाधिकारी, सहायक वनसंरक्षक तेथे जाऊन आले. मात्र तेथे वन्यप्राण्याचे ठसे आढळले नाहीत. त्यावरुन तो तरस असावा असा अधिकाºयांचा अंदाज आहे. लव्हे येथे लांडग्याने त्या शेळ्या खाल्ल्या असाव्यात.- सुरेश कुर्ले, वन कर्मचारी