सोलापूर : पंढरपूर येथील आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी विसाव्याच्या ठिकाणी संशयितरित्या फिरणाºया ३0 जणांविरुद्ध ग्रामीण पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.
वारी शांततेत व सुरळीतपणे पार पडावी तसेच चोरीसारख्या घटना घडू नयेत यासाठी पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक अरुण सावंत यांनी संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखीसोबत पालखी विसाव्याच्या ठिकाणी पेट्रोलिंग केले. पेट्रोलिंग दरम्यान ३० संशयित आरोपी मिळून आले. संशयितांना ताब्यात घेऊन त्यातील २७ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली. ३ जणांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये कारवाई करण्यात आली. दरम्यान, पंढरपूर शहर व तालुक्याच्या ठिकाणी चोरून अवैध दारूचा व्यवसाय करणाºया दोन इसमांविरुद्ध कारवाई करून १० लिटर हातभट्टी व १६ दारूच्या बाटल्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दोघांनी दिली गुन्ह्याची कबुली...- संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी विसाव्याच्या ठिकाणी अमोल नाना काळे (रा. आरोळेवस्ती, जामखेड, जि. अहमदनगर) याची चौकशी केली असता, त्याच्याविरुद्ध जामखेड पोलीस ठाणे जि. अहमदनगर व येरमाळा जि. उस्मानाबाद येथे चोरी, घरफोडीचे गुन्हे आहेत. अक्षय लखन पवार (रा. मिलिंदनगर, जामखेड, जि. अहमदनगर) व अमोल काळे या दोघांनी नातेपुते पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
पंढरपूर शहर व तालुक्याच्या ठिकाणी पेट्रोलिंग करून मालाविषयक गुन्हे करण्याच्या उद्देशाने संशयितरित्या फिरणाºया इसमाचा शोध घेऊन, प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. तीन स्वतंत्र पथक गठीत करण्यात आले असून, दररोज पेट्रोलिंग केले जात आहे. -अरुण सावंत, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा (ग्रामीण)