सोलापूर : महापालिकेच्या सभागृहाला कुलूप लावणाºया काँग्रेसच्या नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्याविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, फुलारे यांच्या आक्रमकतेमुळे काँग्रेसचे नगरसेवक हैराण झाले. गटनेते चेतन नरोटे यांनी शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्यासमोर गटनेतेपदाचा राजीनामा देण्याचा इशारा दिला.
महापालिकेच्या अंदाजपत्रक मंजुरीसाठी गुरुवारी बोलाविण्यात आलेली सभा तहकूब झाली. तत्पूर्वी काँग्रेसच्या नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी सभागृहाला कुलूप घातले. त्यावरून भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी गदारोळ केला. फुलारे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश महापौर शोभा बनशेट्टी यांनी दिले. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने भाजप आणि सेनेचा निषेध करण्यासाठी महापालिकेत आणलेली गाढवं चर्चेचा विषय ठरली.
अनेक वादानंतर गुरुवारी अंदाजपत्रकासाठी सभा घेण्याचा निर्णय झाला होता. सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेचे अंदाजपत्रक तयार नव्हते. त्यामुळे सभा तहकूब करण्याचा निर्णय बुधवारीच झाला होता. गुरुवारी सभेला सुरुवात होण्यापूर्वी काँग्रेसच्या नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी सभागृहाच्या दरवाजांना कुलूप लावले. सभागृहात काँग्रेससह भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक होते. अमोल शिंदे, राजकुमार हंचाटे यांच्यासह भाजपच्या नगरसेविकांनी गोंधळ करायला सुरुवात केली. ही दंडेलशाही चालणार नाही. पोलिसांना बोलवा, अशी मागणी केली. काँग्रेसचे नगरसेवक गोंधळात पडले. चेतन नरोटे, यु. एन. बेरिया यांच्यात चर्चा सुरू झाली. बाहेर श्रीदेवी फुलारे यांनी सत्ताधाºयांवर रोष व्यक्त केला. नंतर गाडीच्या ड्रायव्हरला कुलूप उघडायला सांगितले.
महापौर शोभा बनशेट्टी सभागृहात आल्या. भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी कारवाईसाठी गोंधळ करायला सुुरुवात केली. महापौरांनी स्व. चंद्राम चव्हाण गुरुजी यांना श्रद्धांजली वाहिली. सभा तहकूब करीत असल्याचे सांगण्यापूर्वी त्यांनी मनपा आयुक्तांना कारवाईचे आदेश दिले.
तिसºया दरवाजासमोर ठिय्याश्रीदेवी फुलारे महापालिका सभागृहाच्या तीन दरवाजांना कुलूप लावण्याच्या तयारीने आल्या होत्या. काँग्रेसचे नगरसेवक बाबा मिस्त्री यांना त्यांनी कुलूप दाखविले. एक कुलूप घेऊन बाबा मिस्त्री सभागृहात आले. फुलारे यांनी कुलूप परत घेतले. सभागृहाला कुलूप लावूनका, गुन्हा दाखल होईल, असे सांगण्याचा प्रयत्न बाबा मिस्त्री, विनोद भोसले, नरसिंग कोळी यांनी केला. मी माझ्यासाठी नाही तर शहराच्या विकासासाठी हे करीत आहे. लोकांचे हाल होत आहेत. तुम्हाला यायचं असेल तर या, असे सांगून फुलारे यांनी कुलूप घेतले. श्रीदेवी फुलारे यांनी घरातून दोन कुलूप आणि चाव्या आणल्या होत्या. सभागृहाच्या तीन दरवाजांपैकी दोन दरवाजांना त्यांनी कुलूप लावले तर एका दरवाजाला कडी लावून त्या ठाण मांडून बसल्या.