करमाळा : ग्रामसेवकाला सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून तक्रार केली, तर ॲट्राॅसिटी दाखल करीन असे धमकावल्याप्रकरणी सोगावचे माजी सरपंच कैलास पाखरे याच्याविरुद्ध करमाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत ग्रामसेवक नेमचंद भुजबळ यांनी फिर्याद दिली आहे.
१५ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता सोगाव पश्चिम गावातील शरद तुळशीदास गोडगे याने फोन करून सांगितले की, गावातील माजी सरपंच कैलास हनुमंत पाखरे याने ग्रामपंचायत कार्यालयासमोरील पिण्याच्या पाण्याचा आरओ प्लांटवर दगड मारून तोडफोड केली. याबाबत एका व्यक्तीने ग्रामसेवक नेमचंद भुजबळ यांना फोन करून याची माहिती दिली. त्यांनी लागलीच सोगाव पश्चिम येथे जाऊन पाहिले असता आरओ प्लांटचे पाण्याचे काॅइन बाॅक्ससह इतर साहित्याची तोडफोड झालेली दिसून आली. या तोडफोडीत शासकीय मालमत्तेचे जवळपास ३० हजारांंचे नुकसान झाले आहे.
याप्रकरणी भुजबळ हे करमाळा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी स्वप्नील सोमनाथ गोडगे यांचे सोबत जात असताना पाखरे याने फोनवरून तुम्ही तक्रार करू नका, नाही तर मी तुमच्याविरुद्ध व गावातील माहिती देणाऱ्या लोकांविरुद्ध खोटी ॲट्राॅसिटीची केस करतो, अशी धमकी देऊन शिवीगाळ केली.
१६ करमाळा क्राइम
सोगाव येथे पाण्याच्या आरओ प्लांटची झालेली नासधूस.