सोलापूर : होमगार्डच्या ड्रेसवर जॅकेट घालून नागरिकांना भीती दाखवत पैसे वसूल करणाऱ्या नरेंद्र किसन आयवळे ( रा. सोलापूर ) या होमगार्डवर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत श्रीकांत चंद्रकांत गायकवाड (वय ३१, रा. मुराराजी पेठ, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी गायकवाड हे सरस्वती चौकात दुचाकीवर फोनवर बोलत थांबलेले असताना आरोपी आयवळे हा आपल्या होमगार्डच्या ड्रेसवर जॅकेट घालून गायकवाड यांच्या जवळ येऊन तुझ्या गाडीचे आरसी बुक दाखव, लायसन्स दाखव नाहीतर पाचशे रुपये काढा असे म्हणत त्यांच्याकडून पाचशे रुपये घेतले. त्यानंतर परिसरात थांबलेल्या शेंगा, फुटाणे व आईस्क्रीम विक्री करणाऱ्यांजवळ जाऊन तुम्ही इथे गाडी लावायची नाही. तुम्हाला जर येथे गाडी लावायची असेल तर मला पाचशे रुपये फाईन द्यावे लागेल. म्हणून त्यांच्याशी वाद घालून त्यांच्याजवळ दोनशे रुपये म्हणून घेतले.
यामुळे फिर्यादी गायकवाड यांना संशय आल्याने त्यांनी याबाबत लगेच बीट मार्शल यांना बोलवून घेतले. बीट मार्शल यांनी इसमाकडे चौकशी केल्यानंतर तो पोलीस नसून होमगार्ड असल्याचे कळाले. यामुळे पोलीस नसतानाही लोकांमध्ये भीती दाखवून शेंगा फुटाणे व आईस्क्रीम विकणाऱ्या पैसे घेतल्याप्रकरणी नरेंद्र आयवळे या होमगार्डवर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलीस हवालदार कैलास चौगुले करत आहेत