करमाळा (सोलापूर) : महाराष्ट्र दिनानिमित्त तहसील कार्यालयात ध्वजारोहण समारंभात शेतकऱ्यांनी शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांना घेराव घालत आंदोलन केले. कुकडी प्रकल्पातील पाण्याचे उन्हाळ्यातील आवर्तन करमाळा तालुक्यास मिळावे, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. या वेळी पाटील यांनी पाणी मागणाऱ्या रश्मी बागल यांच्यावर हात उगारून अर्वाच्य व शिवराळ भाषा वापरल्याने पाटील यांच्या विरोधात करमाळा पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हा बँकेच्या संचालिका रश्मी बागल-कोलते व दिग्विजय बागल यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र दिनानिमित्त तहसील कार्यालयाच्या कवायत मैदानावर आ. नारायण पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ पार पडला. त्या वेळी तहसील कार्यालयाच्या वेशीसमोर शेतकऱ्यांनी घेराव घालत कुकडीच्या आवर्तनाचा जाब विचारला. (प्रतिनिधी)
नारायण पाटील यांच्यावर गुन्हा
By admin | Published: May 02, 2017 4:15 AM