वैराग : राळेरास (ता. बार्शी) येथे नागझरी नदीपात्रातील वाळू चोरून बैलगाडीतून नेणाऱ्या दोघाविरुद्ध वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाई दरम्यान पोलीस समोर येताच बैल व गाडी जागेवरच सोडून दोघे तेथून पळून गेले. याबाबत ठाणे अंमलदार रामेश्वर शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. वैराग पोलिसांनी अनोळखी व्यक्तींविरोधात वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार रामेश्वर शिंदे हे शेळगाव बीटला कार्यरत आहेत. पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र राठोड, पोलीस नाईक हाळे, भोसले, गृहरक्षक कदम हे सारे मिळून राळेरास हद्दीत गस्त घालत होते. रविवारी सकाळी त्यांना नदीपात्रात वाळूचा उपसा होत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी नदीपात्राकडे धाव घेतली असून, त्यांना दोन बैलगाड्या वाळू भरून जाताना दिसून आल्या. त्यांना पाहताच गाडीचालक गाडी जागेवरच उभी करून पळून गेले.