मोहोळ : उजनी धरणाच्या कॅनलसाठी करमाळा तालुक्यात संपादीत जमिनीच्या मोबदल्यात मोहोळ तालुक्यातील मिरी येथे पुनर्वसनात मिळालेली जमीन बोगस महिला उभी करून ती खरेदी केल्याप्रकरणी चौघांविरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२० सप्टेंबर रोजी मोहोळ तालुक्यात मिरी येथे ही घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसुधा सुहास जोशी यांची करमाळा येथील जमीन उजनी धरणाकरिता संपादीत करण्यात आली होती. त्याच्या मोबदल्यात मोहोळ तालुक्यातील मिरी येथे सात एकर जमीन मिळाली होती. फिर्यादी वसुधा या पुणे येथे स्थायिक असल्यामुळे ही जमीन पडीक स्वरूपात होती, वहीवाटीत नव्हती.
दरम्यान, १५ सप्टेंबर २०२१ रोजी जमीन तिऱ्हाईत व्यक्तीने परस्पर विकल्याची माहिती मिळाली. त्यानुसार १६ सप्टेंबर रोजी मोहोळ येथील दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन वसुधा यांनी माहिती घेतली असता एका अनोळखी महिलेचे बनावट आधार कार्ड बनवून तिला खरेदीदार म्हणून उभी केले. ही जमीन त्या महिलेने मिरी येथील भाऊसाहेब अण्णा पाटील यांना २५ लाख रुपयाला विकल्याचे निदर्शनास आले. त्या खरेदीखताला साक्षीदार म्हणून मिरी येथील प्रभाकर गोने व बाळकृष्ण पंढरीनाथ पाटील यांनी सह्या केल्याचे निदर्शनास आले.
याप्रकरणी प्रकरणी अनोळखी महिला, भाऊसाहेब पाटील, महेश प्रभाकर गोने व बाळकृष्ण प्रभाकर पाटील या चौघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष माने हे करीत आहेत.