अक्कलकोट : ४३ लाख ८० हजार रुपयांच्या फसवणूक प्रकरणात नागणसूर येथील पोतदार दाम्पत्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी शशीधर पोतदार यांनी फिर्याद दिली आहे. १९ जुलै-२१ रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास पोतदार दाम्पत्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलीस सूत्राकडील माहितीनुसार फिर्यादी शशिधर मनोहर पोतदार (वय ३२), पत्नी प्रियंका शशिधर पोतदार (वय २२, दोघे रा. नागणसूर, ता.अक्कलकोट) यांना आरोपी रमेश दिनकर पोतदार, ईरणा दिनकर पोतदार (दोघे रा.सोलापूर), ईरणा माळप्पा सुतार (रा. कडगंची ता. आळंद जिल्हा कलबुर्गी) यांनी २००९ मध्ये नागणसूर येथे सोन-चांदीचे दुकान लावण्यास परावृत्त केले. त्याला लागणारे सोन, चांदीचे दागिने आरोपींनी पुरविले होते. विक्री, मोडीत आलेले सोने, चांदी याचे हिशोब वेळच्या वेळी देत होते. काही वर्षांनी तक्रार करून आरोपींनी फिर्यादी शशीधरकडे १२ लाख रुपये येणे बाकी असल्याचे सांगून तगादा लावला होता. तेव्हा फिर्यादीने वेळोवेळी हिशेब मागितले असता, धमकी देत टाळाटाळ करीत होते. कंटाळलेल्या पती, पत्नीने कीटकनाशक औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. अधिक तपास हवालदार सुरेश जाधव हे करीत आहेत.