रवींद्र देशमुख
सोलापूर : बाईकचा रेस वाढवून, सायलेन्सरमध्ये बदल करीत कर्णकर्कश आवाज करुन बाईक चालवणाऱ्या तरुणाला धडा शिकवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला. सातरस्ता ते गांधीनगर चौक मार्गावर सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. ताहेर मोहम्मद हमीदअली शेख (वय- २२, रा. प्रभाकर नगर, नई जिंदगी, सोलापूर) असे या बाईकस्वाराचे नाव आहे.
यातील अधिक माहिती अशी की, शनिवारी सायंकाळी ६:३० च्या सुमारास शहर वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार अमोल सुरेश बेगमपूरे हे गांधीनगर चौक परिसरात वाहतूक सेवेचे नियमन करीत होते. या दरम्यान सुसाट वेगाने एम. एच. १३ सी डी १६७३ ही बाईक सात रस्ता मार्गावरुन गांधी चौकाकडे येत होती.
बाईकच्या कर्णकर्कश आवाजाने आजूबाजूच्या लोकांच्या कानटळ्या बसावा असा आवाज होता. वाहनचालकाने सायलेन्सरमध्ये बदल केल्याने हा आवाज येत होता. ड्यूटीवरील पोलीस अमोल बेगमपूरे यांनी सदर तरुणाला हटकून त्याच्याविरुद्ध भादंवि २७९,२६८, २९० प्रमाणे फिर्याद नोंदविली. त्यानुसार गुन्हा नोंदविला. पुढील तपास महिला पोलीस नाईक वाघमोडे करीत आहेत.