सोलापूर : जमिनीच्या फेरफार नोंद घेऊन सातबारा उतारा देण्यासाठी साठ हजारांची लाच घेणाऱ्या तत्कालीन तलाठी विजय हनुमंतप्पा विजापुरे (तत्कालीन तलाठी देगाव, रा. भवानी पेठ, मंड्डी वस्ती) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले होते. विजापुरे याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश रेखा पांढरे यांनी पाच वर्षांचा सश्रम कारावास व चार हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.
जमिनीच्या फेरफारला नोंद घेऊन सातबारा उतारा देण्यासाठी आरोपी विजापुरे याने साठ हजारांची मागणी केली. यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून आरोपीला रंगेहात पकडले होते. याप्रकरणी २०१६ मध्ये सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपाधीक्षक गणेश जवादवाड यांनी करून विजापुरे यांच्याविरुद्ध विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले, तर सहायक फौजदार नीलकंठ जाधवर यांनी दोषारोपपत्र तयार केले. याप्रकरणी न्यायालयाने आरोपी विजय विजापुरे याला गुन्ह्यात दोषी ठरवत पाच वर्षे सश्रम कारावास व चार हजारांचा दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास, अशी शिक्षा सुनावली. याप्रकरणी सरकारतर्फे ॲड. माधुरी देशपांडे यांनी काम पाहिले तर कोर्ट पैरवी म्हणून सहायक पोलीस फौजदार सायबण्णा कोळी, बाणेवाले, घुगे यांनी काम पाहिले.