सोलापूर/ करमाळा : चुलत भाऊ-बहिणीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना करमाळा तालुक्यात घडली. चुलत भावाने अल्पवयीन १६ वर्षीय बहिणीला महिनाभरापूर्वी पळवून नेऊन विवाह केला आणि त्यानंतर लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. या प्रकारानंतर मुलीच्या आईने करमाळा पोलिसांकडे तक्रार केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी २३ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला असून भाऊ-बहीण पोलिसांच्या ताब्यात आलेले नाहीत.
एका महिन्यापूर्वी पीडित मुलगी बेपत्ता झाली होती. भावकीतील चुलत भावाने तिला पळवून नेऊन लग्न केले. त्यानंतर त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यानंतर तपास लागत नसल्याने पीडित मुलीच्या आईने १५ मार्च रोजी करमाळा पोलीस ठाण्याचे निरीक्षक आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रारी अर्ज केला. पीडित अल्पवयीन मुलगी ही अकरावी शास्त्र शाखेला शिकते. सकाळी सात ते अकरा वेळेत महाविद्यालयातील तास संपल्यानंतर एका खासगी हाॅस्पिटलमध्ये काम करत होती. सायकांळी सहा वाजेपर्यंत घरी न आल्याने नातेवाईकांनी चौकशी केली. मात्र ती कुठेही अढळून आली नाही. तसेच शेजारी राहणारा भावकीतील नात्याने चुलत भाऊ असणारा युवकदेखील बेपत्ता असल्याचे नातेवाईकांच्या लक्षात आले. याबाबत पोलिसात उशिरा गुन्हा दाखल झाला. मुलगी अज्ञान असून तिचा संबंधित युवकाशी तिच्या इच्छेविरुद्ध बालविवाह लावला आहे. यासाठी मदत करणाऱ्या नातेवाईक यांच्यावरदेखील गुन्हा दाखल व्हावा आणि सुटका व्हावी असे पीडितेच्या आईने तक्रारी अर्जात म्हटले आहे.