सोलापूर : शहरातील हॉटेल ढाब्यांवर बसून दारु पिणा-यांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाचे धाडसत्र सुरुच असून शुक्रवारी रात्रीच्या सुमारास शहरातील मजरेवाडी होटगी रोडवरील हॉटेल फ्रेंड्स या ठिकाणी धाड टाकला. यात ढाबा चालकासह दारु पिणार्या ६ मद्यपी ग्राहकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने मद्यपींना प्रत्येकी दोन हजार तर हॉटेल चालकाला २५ हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली.
३ मार्च शुक्रवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरिक्षक उषाकिरण मिसाळ यांच्या पथकाने मजरेवाडी होटगी रोडवरील रेल्वे रुळाशेजारील हॉटेल फ्रेंड्समध्ये धाड टाकून हॉटेल चालक प्रणय कल्लाप्पा जमादार ( वय ३२, रा. सैफुल) याच्यासह मद्यपी ग्राहक पांडुरंग विठ्ठल माने, गणेश दिलीप पुकाळे, आदित्य युवराज चंदनशिवे, म्हाळसाकांत मोहन पवार, श्रीकांत दत्तात्रय पाटील व अंकुश तुकाराम वरवटे यांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून दारूच्या बॉटलसह एकूण १४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याचा तपास करून अधिकार्यांनी ४ मार्च रोजी एक दिवसात गुन्ह्याचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले असता न्यायदंडाधिकारी नम्रता बिरादार यांनी तात्काळ निकाल देत ढाबा चालकाला २५ हजार व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी दोन हजार असा एकूण ३७ हजारांचा दंड ठोठावला. ही कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक संभाजी फडतरे, सुनील कदम, दुय्यम निरिक्षक उषाकिरण मिसाळ, सुरेश झगडे, सुनील पाटील , सहायक दुय्यम निरिक्षक मुकेश चव्हाण, जवान प्रकाश सावंत व वाहनचालक रामचंद्र मदने यांच्या पथकाने केली.