सोलापूर/सांगोला - ट्रॅक्टरच्या कर्जाचा हफ्ता खात्यातून न गेल्याने चौकशी करण्यासाठी ग्राहकाने कस्टमर केअरला फोन केला. त्या इसमाने ग्राहकास बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडून ओटीपी नंबर घेऊन त्यांच्या बँक खात्यासह क्रेडिट कार्डवरुन सुमारे 2 लाख 27 हजार 313 रुपये काढून घेतले. चक्क कस्टमर केअरने ग्राहकाची ऑनलाईन फसवणूक केल्याने कस्टमर केअरच्या विश्वासर्हतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
जुजारपूर येथील बजरंग सोपान हिप्परकर यांनी करगणी (ता. आटपाडी) येथील आयसीआयसीआय बँकेकडून कर्ज काढून ट्रॅक्टर विकत घेतला. कर्जाची परतफेड सहामाही हप्त्यातून करीत होते. दरम्यान, ५ फेब्रुवारी रोजी त्यांनी ट्रॅक्टरच्या कर्जाचा हप्ता न गेल्यामुळे माहितीसाठी आयसीआयसीआय बँकेच्या कस्टमर केअरच्या नंबरवर संपर्क साधला. त्याने त्यांना प्ले-स्टोअरमधून एक ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्या इसमाने त्यांना विशिष्ट सूचना करून त्यांच्याशी संवाद साधत असताना त्यांना तुम्ही आमच्या सूचनांचे पालन केल्यानंतर हप्त्याची रक्कम तुमच्या कर्ज खात्यामध्ये जमा होईल, असा विश्वास दिला. त्यानंतर त्यांच्या सेव्हिंग खात्यासह क्रेडिट कार्डवरून नऊवेळा सुमारे २ लाख २७ हजार ३१३ रुपये फसवणूक करून काढून घेतले.
दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी बँकेच्या शाखा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी कस्टमर केअरचा दुसरा नंबर देऊन तक्रार नोंदविण्यास सांगितले. बजरंग हिप्परकर यांनी बँकेच्या कस्टमर केअर तक्रार नोंदवून पोलीस स्टेशनला रीतसर तक्रार दिली आहे.