मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात संजय कोकाटे म्हणाले, बशीर जागीरदार हे माहितीच्या अधिकाराचा दुरूपयोग करून महसूल, उत्पादन शुल्क विभाग, पोलीस खाते, खरेदी विक्री नोंदणी अधिकारी तसेच शिक्षण संस्थांचे पदाधिकारी यांच्याविरुद्ध वारंवार तक्रारी करून आंदोलने, उपोषणे व आत्मदहन करण्याच्या धमक्या देतात. त्यांच्यामुळे शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना काम करणे मुश्कील झाले आहे. त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय ते स्थानिक अधिकारी व कर्मचारी यांच्यावर दबाव आणण्यासाठी राज्यपाल, पोलीस महासंचालक अशा वरिष्ठांकडे खोट्या तक्रारी करतात.
तसेच त्यांनी अवर ओन फाउण्डेशन नावाची संस्था धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केली आहे. या संस्थेला देणगी देण्यासाठी ते अनेकांवर दडपण आणतात. काहींना पावती दिली जाते तर काहींना नाही. या सर्वांची आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी करावी, अशी मागणी कोकाटे यांनी केली आहे.
----
मला काहीही कमेंट करावयाची नाही; पण माहिती अधिकार टाकण्याचा मला अधिकार आहे. अवर ओन फाउण्डेशनचे ऑडिट झाले आहे. मिळालेल्या डोनेशनपेक्षा माझा खर्च जास्त आहे. माझ्या संस्थेत गोंधळ आहे याचा पुरावा आहे का? मी ज्या अधिकाऱ्यांना त्रास दिला, अशी कोणत्या अधिकाऱ्याची तक्रार आहे का? माझ्यावर मोघम आरोप केले आहेत. मीही पत्रकार परिषद घेऊन माझी भूमिका मांडणार आहे.
- बशीर जहागीरदार, अध्यक्ष, अवर ओन फाउण्डेशन