बार्शी : गेली तीन वर्षांपासून एका गाईचा एक पाय पूर्णपणे निकामी झाल्याने ती तीन पायांवर आयुष्य व्यथित करत होती. अनेक समस्या, त्रासाला तोंड देत ती जीवन व्यथित करत होती. जाणीव फाउंडेशन आणि वृक्ष संवर्धनचे सदस्य दीपक पाटील व युवराज वाघमारे यांनी या गाईची व्यथा ओळखून बार्शीतील मित्रमंडळींची मदत घेतली, चौथा पाय कृत्रिमरीत्या बसवून प्रयत्न यशस्वी केले.
हा प्रसंग आहे बार्शी शहरात सुभाषनगर भागातील टिळक चौकात मच्छींद्र पवार नामक व्यक्तीने ही गाय पाळली आहे. तिचा चौथा पाय काही दिवसांपूर्वी निकामी झाला होता. ती अनेक दिवसांपासून लंगडत होती. वृक्षसंवर्धन समितीचे दीपक पाटील आणि युवराज वाघमारे यांना ही बाब निदर्शनास आली. चौथा पाय बसवून देण्यासाठी पाटील आणि वाघमारे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुक्या प्राण्यांसंबंधित कार्य करणाऱ्या डॉक्टरांचा पत्ता शोधून त्यांच्याशी संपर्क केला.
याबाबत माहिती मिळताच हैदराबादचे डॉ. सुरेश गुरुराजन हे बार्शीला येऊन त्यांनी गाईची पाहणी केली. तिच्या पायाचे माप घेतले. लवकरात लवकर कृत्रिम पाय तयार करून पाठविण्याचे आश्वासन दिले.
परंतु लॉकडाऊनमुळे डॉक्टर येऊ शकत नव्हते. त्यांनी स्पीड पोस्टच्या माध्यमातून या गाईसाठी कृत्रिम पाय पाठवून दिला.
त्यानंतर यांनी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी गाईला कृत्रिम पाय बसविण्यात आला. ती चौथ्या पायावर चालू लागली. या प्रसंगी त्यांचे मित्र करण खंडागळे, मॅक्स शिंदे, अण्णा पेठाडे, कन्हैया पवार, आसरा गायकवाड, बाळा जाधव, आतिश कसबे, विशाल रणदिवे, जाणीव फाउंडेशनचे अध्यक्ष तुळसीदास मस्के, संतोष मस्के, सचिव अनंत मस्के, पवन खरसडे हे यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी मल्लिकार्जुन धारुरकर, विनोद ननवरे यांनी उपस्थित राहून सहकार्य केले. या कोरोनाच्या काळातही मुक्या जनावराला कृत्रिम पाय बसवून समाजातील युवकांनी मानवतेचे दर्शन दिले.
---
फोटो : १६ बार्शी ॲनिमल
मच्छींद्र पवार यांच्या अपंग गाईला चौथा पाय बसवून देताना करण खंडागळे, मॅक्स शिंदे, अण्णा पेठाडे, कन्हैया पवार, आसरा गायकवाड, बाळा जाधव, आतिश कसबे, विशाल रणदिवे.