दुष्काळ व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यात कारखान्याची राख फळांवर पडल्याने प्रत व दर्जा कमी होत आहे. त्यामुळे फळांना बाजारभावापेक्षा निम्म्या दराने भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. पांडुरंग कारखान्याचे अधिक क्षमतेने गाळप चालू असल्यामुळे बॉयलरच्या चिमणीतून अधिक काजळीची राख बाहेर फेकल्यामुळे कारखान्यापासून जवळपास दोन ते तीन किलोमीटर पसरत आहे. त्यामुळे या परिसरात हजारो एकर शेती बाधित झाली आहे. या राखेमुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या प्रदूषणाबाबत म्हाळुंगी ग्रामपंचायतीने ग्रामसभेत ठरावही केला होता, असे तक्रारदाराचे म्हणणे आहे.
कारखाना चांगला; पण का वाढले प्रदूषण
कार्यकारी संचालकांचा अधिकारी व कामगार वर्गाशी समन्वयाचा अभाव असल्यामुळे करोडो रुपये खर्च करून प्रदूषण नियंत्रण करणारी यंत्रणा बसवूनही ती यंत्रणा व्यवस्थित कार्यान्वित होत नसल्यामुळे प्रदूषणामध्ये वाढ होत आहे. कारखान्याने राज्य व देशपातळीवर मोठे नाव कमविले आहे. ते नाव जतन करण्यासाठी कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत परिचारक यांनी कारखाना प्रशासनावर लक्ष घालावे, अशी मागणी संचालक, सभासद शेतकऱ्यांमधून होत आहे.
कोट ::::::::::::::::::::::
पांडुरंग कारखाना प्रदूषणाबाबत सर्व नियमांचे पालन करीत आहे. कारखान्याने ऑनलाइन मॉनिटरिंग सिस्टीम ही यंत्रणा कार्यान्वित करून दिल्लीच्या सर्व्हरला जोडून घेतली आहे. त्यामुळे प्रदूषणावर नियंत्रण राहते. बॉयलरमधून राख जात नाही. बाजूला साठलेली राख वाऱ्याने उडून जात आहे. तरी आम्ही शेतकऱ्यांच्या तक्रारीचे योग्य ते निवारण करीत असतो.
- यशवंत कुलकर्णी
कार्यकारी संचालक, पांडुरंग कारखाना, श्रीपूर
कोट :::::::::::::::
शेतकऱ्यांच्या तक्रारीत माझे क्षेत्र कारखान्यापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहे. या क्षेत्रामध्ये ॲपल बोर, डाळिंब, केळीच्या बागा आहेत. पांडुरंग कारखान्याच्या चिमणीतून राख फळबागांवर पडल्याने बाजारात माल अत्यंत कमी दराने विक्री होत आहे. त्यामुळे आठ ते दहा लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. राखेमुळे तोडणीस मजूर जास्त पगार मागत आहेत. तसेच मजुरांच्या डोळ्यात राख जाऊन डोळ्याचे आजार होत आहे. त्याचाही खर्च करावा लागत आहे.
- अशोक मारुती जाधव
महाळुंग-श्रीपूर, तक्रारदार शेतकरी
कोट ::::::::::::::::::::
माझी साडेपाच एकर क्षेत्रामध्ये केळीची लागवड आहे. पांडुरंग कारखान्याच्या बॉयलरमधून निघणारी राख केळीच्या पिकावर पडत आहे. राखेमुळे खराब झालेल्या केळीला बाजारात मागणी नाही. त्यामुळे सहा ते सात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
- मनीषा सुरेश मुंडफणे
महाळुंग-श्रीपूर, तक्रारदार महिला शेतकरी