सोलापूर : पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत विमा कंपनीने जिल्ह्यातील सोयाबीन पीक विम्याच्या १ लाख १६ हजार १७३ शेतकऱ्यांपैकी ८८ हजार ३५२ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ८० कोटी ७८ लाख रुपये जमा केल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी दिली आहे.त्यांमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत पीक विमा कंपनीमार्फत सोयाबीन, मका व बाजरी पीकांसाठी पात्र विमाधारक शेतक-यांना २५ टक्के नुकसान भरपाई रक्कम नोव्हेंबरच्या दुस-या आठवड्यापासून वितरीत केले जाणार होते. परंतु विमा कंपनीने सोयाबीन पीक विमा रक्कम संदर्भात विभागीय आयुक्ताकडे अपील दाखल केले. त्या अपिलाच्या सुनावणीमध्ये जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विमा कंपनीचे सर्व मुद्दे खोडून काढले. त्यामुळे, कंपनीला अखेर शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम द्यावीच लागली.