चपळगाव : अक्कलकोट तालुक्यात खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले. तालुका कृषी कार्यालयामार्फत भारती ॲक्सा जनरल इन्शुरन्स कंपनीला नुकसानग्रस्त ५४६ शेतक-यांची यादी पाठवून दिले. त्यानंतर संबंधित विमा कंपनी अधिका-यांनी नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे केले. मात्र मागील वर्षाच्या खरीप पिकांच्या नुकसानीपोटी मागील आठवड्यात संबंधित शेतक-यां खात्यावर ३०, ५०, ७० रुपये अशी नगण्य रक्कम जमा झाली.
ही बाब अन्यायकारक असल्याने चपळगाव, डोंबरजवळगे, कुरनूर, मोट्याळ, चुंगी, बसवगीर या गावांमधील नुकसानग्रस्त शेतक-यांनी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्याकडे अन्यायापोटी दाद मागितली. याची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषिमंत्री दादाराव भुसे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर यांच्याशी पत्रव्यवहार केला.
-----
मागील वर्षीच्या खरिपावर अतिवृष्टीमुळे फार मोठा परिणाम झाला. अक्कलकोट तालुक्यातील शेतक-यांना विमा कंपनीकडून नुकसानीपोटी आवश्यक रक्कम मिळाली नाही. यासाठी लवकरच मुख्यमंत्री व कृषिमंत्री यांची भेट घेणार आहे.
-सिद्धाराम म्हेत्रे, माजी गृहराज्यमंत्री
-----
विमा कंपनीकडून माहिती घेणार
मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे ५४६ शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे नुकसानीची माहिती आम्हाला मिळाली. मागील आठवड्यात नुकसानीपोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर नाममात्र रक्कम जमा झाली आहे. याविषयी कंपनीने किती टक्के नुकसान गणले आहे, याची माहिती घेऊन वरिष्ठ विभागाला कळवून शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न असेल.
- सूर्यकांत वडखेलकर, तालुका, कृषी अधिकारी
040721\img-20210701-wa0037.jpg
पिक विम्याच्या प्रश्नासंदर्भात माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांनी जिल्हाधिकारी,मुख्यमंत्री व कृषीमंत्र्यांना असे पत्र लिहीले.