देहूगाव : आषाढी एकादशीनिमित्त सोमवारी देहूगाव येथील मुख्य देऊळवाड्यातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात व श्रीसंत तुकाराम महाराजांच्या मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र देहू येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात व शिळा मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. आषाढी एकादशीचे महत्त्व लक्षात घेऊन देहू पंचक्रोशीतील भाविकांसह राज्याच्या विविध भागातून आलेल्या भाविकांनी सोमवारी येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व श्री संत तुकाराममहाराज शिळामंदिरात दर्शन घेतले. पहाटेपासूनच मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. हा भाविकांचा उत्साह पावसाच्या हलक्या सरी कोसळत असतानाही कायम होता. दर्शन बारीही पालखी मार्गावरील बाजारआळीतील शिरीषकुमार मित्र मंडळ चौकापर्यंत गेली होती. दुपारनंतर गर्दी हळूहळू वाढतच गेली.पहाटे साडेचारला संस्थानच्या मुख्य पुजाऱ्यांच्या हस्ते महापूजा व काकडआरती करण्यात आली. पहाटे पाचच्या सुमारास शिळामंदिरातील नैमित्तिक विधिवत महापूजा केली. त्यानंतर भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले.पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या. यामुळे देहू परिसरातील वातावरण सकाळपासूनच आल्हाददायक होते. मात्र दर्शनाच्या रांगा दर्शनबारीतून लावण्यात आल्याने भाविकांना पावसाचा फारसा त्रास झाला नाही. मंदिराच्या आवारात मॅट टाकण्यात आल्या होत्या.सकाळपासून इंद्रायणी नदीचा काठही भाविकांच्या गर्दीमुळे फुलून गेला होता. यातच परिसरात चांगला पाऊस झाल्याने इंद्रायणी नदी ओसंडून वाहत होती. परिसरातील काही शाळांनी देखील एकादशीचा दिवस साधत दिंडीने मंदिरात येऊन दर्शन घेतले.दुपारनंतर स्थानिक भाविकांनीही मोठी गर्दी केली होती. त्याचप्रमाणे जे भाविक पंढरपूरच्या वारीला दाखल झाले होते. त्यांची परतीचा प्रवास करण्यापूर्वी देहू व आळंदी येथे दर्शन घेतले.
देहू, आळंदीत दर्शनासाठी भाविकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 12:48 AM