सोलापूर : मागील ६० वर्षांपासून अधिक काळ विजापूर वेस येथील मीना बाजारात यंदाच्या वर्षीही खरेदीसाठी हिंदू-मुस्लीम बांधवांची झुंबड उडाली आहे. कपडे, ज्वेलरी, खाद्यपदार्थ, विविध ड्रायफ्रूट्स, अत्तरे, घरगुती साहित्य, मेहंदी यासह अन्य वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे.
रमजानच्या पवित्र महिन्यात ईद साजरी करण्यासाठी सर्व वस्तू एकाच छताखाली उपलब्ध व्हाव्यात, असा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून मागील साठ वर्षांपासून मीना बाजार भरविला जातो. विजापूर वेस, बाराईमाम चौक, किडवाई चौक, बेगम पेठ या भागात हा बाजार भरतो. ईदच्या पार्श्वभूमीवर भरविण्यात आलेल्या बाजारात सध्या ४५० ते ५०० स्टॉलधारक आहेत़. यामध्ये चपलांपासून डोक्याच्या तेलापर्यंत आवश्यक त्या सर्व वस्तूंचा समावेश आहे.
संसारोपयोगी भांडी, खाद्यपदार्थ कमी किमतीत या ठिकाणी मिळतात. लातूर, उस्मानाबाद, विजयपूर, पंढरपूर व स्थानिक व्यापाºयांनी स्टॉल उभे केले आहेत़ योग्य किमतीत भरपूर खरेदी मीना बाजारात करता येते. खरेदीसाठी शहर व जिल्ह्यातून मोठी गर्दी होत आहे. सुरुवातीला फक्त महिलांसाठी प्रवेश होता, मात्र आता सर्वांसाठी खुला करण्यात आला आहे. त्यानंतर ग्राहकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात वाढला.
हैदराबादी बांगड्यांना जास्त मागणी- बांगड्यांमध्ये हैदराबादी बांगड्यांना जास्त मागणी असून, कंकर गोट, कुंदन गोट, मोती गोट, काचेच्या बांगड्या, फॅन्सी बांगड्या, मेटल बांगड्या आल्या आहेत. ४० रुपयांपासून २०० रुपये किंमत आहे. यामध्ये सर्वाधिक मागणी ही कंकर गोट आणि मोती गोटला आहे. बेंटेक्सच्या साहित्यामध्ये मोती हार सेट, केंकर हार सेट, टॉप्स, एअर रिंग, अंगठी, गोल्डन बांगड्या आदी अनेक प्रकारचे साहित्य बाजारात असून, हे १०० रुपयांपासून २००० रुपयांपर्यंत आहेत. त्याशिवाय बो, स्पेलिंग चेन, पीन, काटा, साडी पीन आदी अनेक प्रकारचे साहित्य प्रत्येकी १० रुपयांत विकणाºया स्टॉलचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वजण या मीना बाजाराचा आनंद घेत आहेत.
छोटे व्यापारी रस्त्यावर...- मीना बाजारात रस्त्याच्या मधोमध छोटे व्यापारी स्टॉल लावून बसतात. सर्व प्रकारच्या वस्तू या ठिकाणी मिळतात. रस्त्याच्या मध्यभागी बसलेल्या व्यापाºयांना पोलीस उठवतात, मात्र ते पुन्हा तिथेच येऊन आपला व्यवसाय करतात. या व्यापाºयांना पर्याय नसतो, मात्र ते मोठ्या चिकाटीने व्यापार करतानाचे चित्र दिसून येत आहे़
वाहन मार्गात बदल- मीना बाजारामुळे विजापूर वेस, किडवाई चौक, बेगम पेठ, बाराईमाम चौक, बाकळे प्रेस, लक्ष्मी मार्केट, पंचकट्टा, पेंटर चौक, रंगरेज बोळ, माणिक चौक ते विजापूर वेस रोड मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. वाहनांसाठी माणिक चौक-समाचार चौक, भावसार पथ, बाराईमाम चौक-किडवाई चौकमार्गे बेगमपेठ पोलीस चौकी, पंचकट्टा, लक्ष्मी मार्केट, दत्त चौक आदी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन शहर वाहतूक पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
लहान मुलांच्या कपड्यांची क्रेझ कायम- लहान मुलांपासून मोठ्या पुरुषांपर्यंत सर्वांसाठी बेल्ट, पॉकेट, गॉगल्स, चप्पल, बूट, सँडेल विक्रीचे स्टॉल लागले आहेत. महिलांचे खास आकर्षण असलेल्या बांगड्या खरेदीसाठी गर्दी होत असून, यामध्ये जयपूर आणि हैदराबादी बांगड्यांना मोठी मागणी आहे.
पोलिसांचा चोख बंदोबस्त- रमजान ईदनिमित्त विजापूर वेस, किडवाई चौक, बेगम पेठ, लक्ष्मी मार्केट आदी भागात मीना बाजार व बेगम बाजार भरविण्यात आला आहे. बाजारपेठेत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस आयुक्तालयाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विजापूर वेस येथे फिक्स पॉइंट असून, अधिकची पोलीस कुमक या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे. पोलीस अधिकारी, कर्मचारी सातत्याने बाजारपेठेत फेरफटका मारत आहेत़ महिला पोलीस कर्मचाºयांचाही समावेश आहे. रस्त्यावर गर्दी झाली की, ती कमी करण्यासाठी पोलीस कसोशीने प्रयत्न करीत आहेत़
रमजान ईदमध्ये मीना बाजार ही ग्राहकांसाठी एक पर्वणीच असते. या बाजारात नागरिक मनसोक्त खरेदी करतात. बाजारातील व्यापारी जास्तीचा नफा न पाहता एक भक्ती म्हणून व्यवसाय करतात. बाजारात फक्त मुस्लीमच नव्हे तर सर्व धर्माचे लोक खरेदीसाठी येतात. बाजारात एकाच छताखाली सर्व वस्तू मिळतात़ त्यामुळे ग्राहक समाधानी होतो़ रमजान ईद मोठ्या आनंदात साजरी केली जाते. - महंमद सलीम इब्राहिम हिरोली, अध्यक्ष, मीना बाजार कमिटी, विजापूर वेस.
ज्वेलरी खरेदीसाठी महिलांची झुंबड...- ईदमध्ये महिलांना सजण्यासाठी आवश्यक असलेली ज्वेलरी विक्री करण्यासाठी अनेक स्टॉल सजले आहेत. कानातील विविध फुले, गळ्यातील आकर्षक दागिने, हातातील बांगड्या, नेलपेंट, मेहंदी, विविध रंगांचे आकर्षक ड्रेस मटेरियल आदी विविध वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. सणातील आकर्षण असलेली मेहंदी विक्री करणारे स्टॉलही लावण्यात आले आहेत. नर्गिस, कॅटरिना, करिना, प्रेम दुल्हन, हिना आदी विविध प्रकारच्या मेहंदी विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.