लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी होत आहे. याकडे नगरपरिषद प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन गर्दी कमी करत लसीकरणाचे काम सुरळीत पार पाडावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
बार्शी नगरपरिषदेच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान योजनेअंतर्गत जवाहर हॉस्पिटलच्या आवारात नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या केंद्रावर लसीकरणाची सोय केली आहे. मागील काही दिवसांपासून लसीचा पुरवठा वेळेवर होत नसल्याने लस उपलब्ध झाल्यावर लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.
वयोगट ४५च्या पुढील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. यासाठी अॅपव्दारे प्रथम लसीकरणाची नोंद केली जाते. त्यानंतर त्याचे व्हेरिफिकेशन करून लसीकरण करण्यात येते. तत्पूर्वी बार्शी नगर परिषदेने लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांची रॅपिड टेस्ट करणे बंधनकारक केले आहे.
त्यामुळे लसीकरणापूर्वी केंद्राबाहेर रॅपिड टेस्टसाठी गर्दी होत आहे. रॅपिड टेस्टनंतर नागरिकांना आधारकार्डव्दारे केंद्रावर नोंदणी करून त्यानंतर व्हेरिफिकेशन करावे लागते. ही सर्व प्रक्रिया संगणकाव्दारे केली जाते. यात वेळ जातो. त्यामुळे नागरिकांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागते.
राम नवमीच्या सुटीमुळे बुधवारी लसीकरण बंद होते. त्यामुळे गुरूवारी सकाळी ७ पासून या केंद्रावर नागरिकांची झुंबड उडाली. यात रॅपिड टेस्टची वेगळी रांग व ऑनलाईन नोंदणीची स्वतंत्र अशा रांगा लागल्या होत्या. गर्दी व रांगेमुळे कोरोनाच्या नियमांचे पालन झाले नाही. सोशल डिस्टन्सिंगचा नियम पायदळी तुटवला गेला.
------------
२२० लसी पाठविल्या
गुरुवारी या केंद्रावर २२० लसीचा साठा पाठविण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक ढगे यांनी दिली. गर्दी होत असल्याने डॉ. ढगे यांनी या केंद्रावर जाऊन तिथेल कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना देत लसीकरण सुरळीत करण्यास सांगितले. दुपारी १ नंतर लसीकरण सुरळीत झाले. यावेळी केंद्राचे नोडल ऑफिसर डॉ. नितीन लाड, माढेकर, डॉ. सुधीर घोडके व कर्मचारी उपस्थित होते.