मंगळवेढा : दसऱ्याला झेंडू, शेवंतीच्या फुलांना विशेष महत्त्व आहे. मात्र अतिवृष्टीमुळे झेंडू खराब झाल्यामुळे झेंडूच्या फुलांचे भाव गगनाला जाऊन भिडले होते. दरवर्षी ५० ते ६० रुपये किलोप्रमाणे मिळणारा झेंडू यंदा दसºयाच्या दिवशी चक्क २०० ते ३०० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला होता. पहिल्यांदाच झेंडूला एवढा विक्रमी भाव मिळाला. स्थानिक थोडेफार शेतकरी वगळता बाहेरच्या तालुक्यातील झेंडूची फुले मंगळवेढा शहरात आणून विक्री करणाऱ्या व्यापाºयांचा फायदा झाला.
दसऱ्याला वाहनांना, घरी फोटो ला ही तोरणे लावून पूजा करण्यात येते. त्यामुळे या फुलाला विशेष मागणी असते. यंदा पावसामुळे मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने अचानक आज झेंडू आणि शेवंतीच्या फुलांचे दर वाढले.वाढलेल्या दराने नागरिकांना वाहनांना हारा ऐवजी फुल वाहूनच पुजा करण्याची वेळ आलेली आहे.
यंदा सप्टेंबरमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने तालुक्यातील झेंडू काळवंडला आहे. यामुळे रंगदार झेंडू भाव खाऊन गेला. झेंडूची बिकट परिस्थिती लक्षात घेता चाणाक्ष व्यापाऱ्यांनी बाहेरच्या तालुक्यातुन शेजारच्या कर्नाटक भागातुन झेंडूची फुले आणून येथे विकली. दसऱ्याच्या आदल्या दिवशी शनिवारी १०० ते १५० रुपये किलोने झेंडू विकला जात होता; पण आज दसºयाला सकाळी पंढरपूर, सोलापूरहुन झेंडूची कमी आवक झाल्याने झेंडूचा भाव वाढून २०० रुपये तर काही भागात ३०० रुपये किलोपर्यंत विकल्या गेला. एवढेच काय पण सकाळी दामाजी पुतळा परिसरात रस्त्यावर ढीग मांडून बसलेल्या विक्रेत्यांकडील झेंडूची फुले घेण्यासाठी झुंबड उडाली होती. दुपारनंतर भाव कमी होतील, या आशेने अनेक जण आल्यापावली घरी परतले . अनेकांनी एक किलो घ्यायची तिथे अर्धा किलो घेतली. सर्वत्र आपट्याची पाने विकणारे विक्रेते दिसून येत होते.
या भाववाढीचा फायदा काही शेतकऱ्यांनाच झाला, पण या ‘व्यापाऱ्यांनी’ चांदी करून घेतली. परजिल्ह्यांतून झेंडू आणून येथे विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी तिप्पट नफा कमावला.सर्वसामान्य ग्राहकांना फुले खरेदी करण्यासाठी कोरोनाच्या काळात खिसा अधिक रिकामा करावा लागला आहे
फिजिकल डिस्टसिंगचा फज्जा...
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून अनलॉक करीत असताना ग्राहकांनी व व्यापाऱ्यांनी बाजारात फिजिकल डिस्टसिंग पाळण्याच्या सूचना शासनाने दिलेल्या आहेत. या सूचनेला केराची टोपली दाखवीत आज मंगळवेढा येथे दामाजी पुतळ्याभोवताली फुल बाजारात किरकोळ दुकानदारांनी रस्त्याच्या कडेलाच दुकाने थाटल्याने सोशल डिस्टसिंगचा पूर्णपणे फज्जा उडाला
या वर्षी अतिवृष्टीमुळे झेंडूचे उत्पादन कमी असल्याने गेल्या वर्षीच्या मानाने किमतीत दुपटीने वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात झेंडू २०० ते ३०० रुपये किलोपर्यंत गेला आहे. बाजारात झेंडूच्या फुलांसोबत शेवंती, निशीगंधा, गुलाबांच्या फुलही बाजारात असून भाव गगनाला भिडले आहेत.- दयानंद बनसोडे, सुगंधी फ्लॉवर मर्चंट