- अरुण बारसकरसोलापूर- राज्यात आता ऊस गाळपाने चांगलाच वेग घेतला असून, साखर आयुक्त कार्यालयाला आलेल्या माहितीनुसार १०३ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. एकूण १७ लाख २० हजार मेट्रिक टन इतके गाळप झाले आहे. एकूण १५१ कारखान्यांना गाळप परवाने देण्यात आले आहेत.
यंदा एक नोव्हेंबरपासून साखर कारखाने सुरू करण्यास परवानगी शासनाने दिली आहे. त्यामुळे एक नोव्हेंबरनंतर साखर कारखाने सुरू होण्यास सुरुवात झाली आहे. यावर्षी परतीचा पाऊस २९ आॅक्टोबरपर्यंत पडत राहिल्यानेही कारखाने सुरू करण्यास अडथळा आला होता. ऊस तोडीसाठी वाहने जाण्याची सोय नसल्याने काही कारखान्यांनी उशिराच गाळप हंगाम सुरू केला. याशिवाय शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचाही फटका कारखाने सुरू करण्यासाठी बसला आहे. रविवारी कोल्हापूर येथे ऊस दराचा तिढा सुटल्यानंतर सगळीकडेच कारखाने सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या राज्यात गाळप परवाना दिलेल्या कारखान्यांपैकी १०३ कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. राज्यातील सात विभागांपैकी नागपूर वगळता अन्य सहा विभागातील साखर कारखाने सुरू झाले आहेत. कारखान्यांची संख्या सर्वाधिक असलेल्या पुणे विभागातील पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक कारखाने सुरू झाले आहेत. कोल्हापूर विभागातील कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील १९, पुणे विभागातील पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील ३६, अहमदनगर विभागातील अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील १९, औरंगाबाद विभागातील धुळे, नंदूरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यातील १०, नांदेड विभागातील नांदेड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर १७ व अमरावती विभागातील अमरावती, बुलढाणा, अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील दोन साखर कारखान्यांचे गाळप सुरू झाले असल्याची आकडेवारी साखर आयुक्त कार्यालयाकडे आली आहे. --------------------उताºयात पुणे विभाग आघाडीवर !- राज्यातील १०३ साखर कारखान्यांचे १७ लाख २० हजार इतके गाळप झाले.- गाळप झालेल्या उसापोटी १० लाख ६५ हजार क्विंटल साखर तयार झाली असून साखर उतारा ६.२० टक्के इतका पडला.- साखर कारखान्याच्या संख्येत आघाडीवर असलेल्या पुणे विभागातील कारखाने गाळपातही आघाडीवर असून उताºयातही आज तरी सोलापूर जिल्ह्याची आघाडी आहे. - साखर आयुक्त कार्यालयाला कारखाने सुरू झालेली संख्या १०३ इतकीच नोंदली असली तरी प्रत्यक्षात १२५ हून अधिक कारखाने सुरू झाले असल्याचे सांगण्यात आले. - राज्यातील सर्वच सात विभागातील गाळप परवान्यासाठी आॅनलाईन अर्ज केलेल्या १९३ पैकी १५१ साखर कारखान्यांना गाळप परवाना दिला आहे.