यंदा जिल्ह्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने गळीत हंगाम किमान १५० दिवस चालेल असा अंदाज कारखानदारांनी व्यक्त केला होता. परतीच्या पावसामुळे कारखाने उशिराने सुरू झाले तरीही अपेक्षेपेक्षा दीड महिना गाळप हंगाम लवकर संपत आहे. विशेषत: सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील ऊस जवळपास संपला आहे. त्यामुळे मार्चअखेरपर्यंत हंगाम सुरू ठेवण्याची कारखानदारांची अपेक्षा यंदा फोल ठरली आहे. विशेषतः कमी गाळप क्षमतेचे कारखाने लवकर बंद करण्याची तयारी कारखानदारांनी सुरू केली आहे.
दरवर्षी सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतील साखर कारखान्यांना शेजारच्या कर्नाटक राज्यातून ऊसपुरवठा होत होता. जिल्ह्यातील अनेक कारखाने कर्नाटकातील उसावर गाळपाची भिस्त ठेवून होते; परंतु यंदा कर्नाटकातून ऊस आणता आला नाही. कर्नाटकातही साखर कारखान्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे तेथील कारखान्यांना गाळप क्षमतेच्या प्रमाणात ऊस उपलब्ध झाला नाही. यंदा कर्नाटकच्या कारखान्यांनीच सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात तोडणी आणि वाहतूक यंत्रणा बसविली होती. जिल्ह्यातील कारखान्यांच्या गाळपावर त्याचा परिणाम झाला. जिल्ह्यातील तीन लाख मेट्रिक टन ऊस कर्नाटकात गेल्याने गाळप कमी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
हंगाम ११० दिवसांचाच
सोलापूर जिल्ह्यात उसाचे क्षेत्र पाहता सुरुवातीला गाळप हंगाम किमान १५० दिवस चालेल असा अंदाज वर्तविला जात होता. साखर उद्योगातील अनुभवी मंडळींनी याच अंदाजानुसार नियोजन केले होते; परंतु हंगाम ११० पेक्षा जास्त दिवस चालण्याची शक्यता नाही. जिल्ह्यातील उसाचे क्षेत्र संपत आल्याने हंगाम आटोपता घ्यावा लागला. कमी गाळप क्षमतेचे कारखाने कसेबसे फेब्रुवारी अखेरपर्यंत चालतील, तर जास्त गाळप क्षमतेचे कारखाने १० मार्च पर्यंत चालतील अशी स्थिती आहे.
तोडणी, वाहतूक यंत्रणा परतीच्या मार्गावर
गाळपासाठी ऊस कमी पडल्याने काही कारखाने एक किंवा दोन पाळीत सुरू आहेत. गाळप क्षमतेपेक्षा कमी ऊस उपलब्ध होत आहे. त्यामुळे अनेक कारखान्यांचे गाळप क्षमतेपेक्षा कमी गाळप करीत आहेत. ऊस क्षेत्र संपत चालल्याने तोडणी करणाऱ्या टोळ्या आणि वाहतूक यंत्रणा आता परतीच्या तयारीला लागल्या आहेत.
१ कोटी २० लाख मे. टन गाळप
यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील २९ कारखाने सुरू आहेत. आतापर्यंत १ कोटी २० लाख ४९ हजार मे. टन उसाचे गाळप झाले. १ कोटी १० लाख ७९ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा ९.१९ टक्के आहे. हंगाम संपेपर्यंतही साखर उतारा १० टक्क्यांपर्यंत जाईल, अशी स्थिती नाही.
तोडणी कामगार अडचणीत
संपूर्ण हंगामासाठी १० कोयते असलेल्या ऊस तोडणी कामगारांच्या टोळीला साखर कारखाने किमान पाच लाख ॲडव्हान्स देतात. हंगामात एक हजारपेक्षा जास्त उसाची तोडणी झाली तरच कारखान्यांनी दिलेल्या ॲडव्हान्सची परतफेड होऊ शकते. यंदा अनेक टोळ्यांचे ॲडव्हान्सदेखील वसूल झाले नाही. कमी गाळप झाल्याने कारखाने, तोडणी कामगार आणि वाहतूक यंत्रणा अडचणीत सापडल्या आहेत.